
बाणावलीत ‘आप’च्या पुढाकारातून व्हीआर विज्ञान प्रयोगशाळा
मडगाव : आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांच्या आमदार निधीतून कारमोना येथील सेक्रेड हार्ट ऑफ जीझस हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक, अनुदानित शाळांचा विकास आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर टीका केली.
उद्घाटनानंतर बोलताना आतिशी यांनी गोव्यातील बहुतांश आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे स्वतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतलेले असूनही त्यांनी आपल्या आमदार निधीतून त्या शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला नसल्याची खंत व्यक्त केली. अनुदानित शाळांमध्येही खासगी शाळांप्रमाणे किंवा त्याहून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, चांगल्या पायाभूत सुविधा असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार होते. निवडणुकांदरम्यान अनेक लोकप्रतिनिधींची संपत्ती वाढते; मात्र शाळांच्या विकासाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी सांगितले की, ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले, त्याच शाळेच्या विकासासाठी आमदार निधी वापरता आल्याचा आनंद आहे. अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणविषयक धोरणातून प्रेरणा घेऊन बेनाउलिम मतदारसंघात आधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की, मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने व्हीआर विज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा मानस आहे. तसेच सर्व आठ शाळांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, ई-लायब्ररी सुविधा आणि आवश्यक दुरुस्तीची कामे आमदार निधीतून करण्यात आली आहेत. या सुविधांचा सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचा दावा त्यांनी केला.
उद्घाटन करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत अत्याधुनिक व्हीआर शिक्षण प्रणाली, डिजिटल शैक्षणिक साहित्य आणि आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शाळेची दुरुस्ती आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्थाही आमदार निधीतून करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, गोव्यात सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक अनुदानित शाळेच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक उन्नतीसाठी ३ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी दिले.







