ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ स्पर्धेत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेतील महिला ४८ किलो वजनी गटात मीराबाईने एकूण १९० किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. यासह कॉमनवेल्थ स्पर्धेतील तिचे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.
मीराबाईला स्पर्धेची सुरुवात अपेक्षेप्रमाणे करता आली नाही. स्नॅच प्रकारातील पहिल्याच प्रयत्नात ८२ किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने ८२ किलो वजन यशस्वीरीत्या उचलत दमदार पुनरागमन केले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून तिने कॉमनवेल्थ स्पर्धेचा नवा विक्रम आपल्या नावावर केला.
क्लीन अँड जर्क प्रकारातही तिचा पहिला १०५ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने हे वजन यशस्वीरित्या उचलत सुवर्णपदक निश्चित केले. दुसऱ्याच प्रयत्नात आघाडी निश्चित झाल्याने तिला तिसरा प्रयत्न करण्याची आवश्यकता भासली नाही.
याआधी मीराबाई चानूने २०१८ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात, तर २०२२ च्या स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता २०२६ मध्येही सुवर्णपदक जिंकत तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अव्वल राहण्याची किमया साधली आहे.
ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती. तसेच ६० किलो वजनी गटात ऋषिकांत सिंग याने एकूण २६४ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले.




