देश/जग

गुवाहाटीत पत्नीची हत्या; शीर फ्रिजमध्ये आढळले, पतीला अटक

गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटी येथे पत्नीची हत्या करून तिचे शीर फ्रिजमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिया तालुकदार गोस्वामी (२५) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती रामानुज गोस्वामी (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गुवाहाटीतील हाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. रिया आणि रामानुज यांचा सुमारे सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. रिया एका बुटीकमध्ये काम करत होती, तर रामानुज कॅबचालक असल्याचे वृत्त आहे.

दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

गेल्या दोन दिवसांपासून दाम्पत्याचा संपर्क होत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. त्याचदरम्यान घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर रियाचा मृतदेह आढळला. तिचे शीर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. घराची झडती घेतल्यानंतर तिचे शीर प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवलेले आढळले. तिच्या हाताची बोटेही कापण्यात आल्याचे तपासात समोर आले.

घटनास्थळावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेले हत्यार जप्त केले असून, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार हत्या झाल्याला २४ ते ४८ तासांचा कालावधी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या?

पोलिसांसमोर शरण आल्यानंतर रामानुजने पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा दावा केला आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेला वाद दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू होता आणि त्याचवेळी रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचे त्याने सांगितल्याचे वृत्त आहे.

मात्र, पतीने केलेला हा दावा पोलिसांकडून अद्याप पडताळून पाहिला जात आहे. हत्येमागील नेमके कारण निश्चित झालेले नसून, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येपूर्वी आणि हत्येनंतर नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!