
गणेश चतुर्थीनिमित्त ‘आमची चवथ’ रील स्पर्धा
मडगाव : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मडगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘आमची चवथ’ या नावाने रील निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मडगावचो आवाज’ या उपक्रमाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, नागरिकांना आपल्या घरातील गणेश चतुर्थी उत्सवाचे ६० सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ रील पाठविता येणार आहेत.
या स्पर्धेत केवळ मडगाव विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी आपल्या घरातील श्री गणेश चतुर्थीच्या उत्सवाचा व्हिडीओ तयार करून तो व्हॉट्सॲपद्वारे ८४२१५९७८०३ या क्रमांकावर पाठवायचा आहे. व्हिडीओसोबत सहभागीचे नाव आणि संपूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला किंवा घराला एकच प्रवेशिका पाठविता येईल.
अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक — ५,००० रुपये
द्वितीय क्रमांक — ३,००० रुपये
तृतीय क्रमांक — २,००० रुपये
प्रथम उत्तेजनार्थ — १,००० रुपये
द्वितीय उत्तेजनार्थ — ५०० रुपये
स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी सामग्री मूळ आणि स्वतः तयार केलेली असावी. इतरांच्या सामग्रीचे संपादन करून ती सादर करता येणार नाही. तसेच सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक संवेदनशीलतेचे भान राखणे आवश्यक असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेली सामग्री स्वीकारली जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेचा निकाल परीक्षकांच्या निर्णयानुसार निश्चित केला जाणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आयोजकांनी मडगावमधील नागरिकांना गणेश चतुर्थीतील आपल्या घरातील उत्सव, परंपरा आणि वातावरण रीलच्या माध्यमातून मांडण्याचे आवाहन केले आहे.


