
खांडोळ्यात २६, २७ सप्टेंबरला होणार ‘चित्रंगी’
पणजी : कोंकणी भाषा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा लीलावती दामोदर नाईक स्मृती ‘चित्रंगी’ कार्यक्रम २६ आणि २७ सप्टेंबर रोजी खांडोळा येथील शासकीय महाविद्यालयात होणार आहे. महिलाविषयक प्रश्न, कोंकणी साहित्य आणि लोकशाही या विषयांवर चर्चासत्रे, मुलाखती, संवादात्मक सत्रे तसेच साहित्यिक कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सामाजिक कार्यकर्त्या सनॉबर किश्वर यांच्या हस्ते होणार आहे. कोंकणी भाषा मंडळाच्या सहकार्याने शासकीय महाविद्यालय, खांडोळा येथे हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी लेखिका हेमा नाईक यांची मुलाखत नूतन साखरदांडे आणि युवा कार्यकर्त्या कात्यायनी घाटवाल घेणार आहेत. त्यानंतर धनिक्षा सावंत आपल्या विचारांचे मांडणी करणार आहे.
‘बायल बदलता?’ या विषयावरील चर्चासत्रात सोबिता कुडतकर, मानसी कुंभारजुवेकर, साक्षी काळे आणि अमरीन शेख सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप रात्रीच्या साहित्यिक कार्यक्रमाने होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी ‘अस्तुरी हो प्रवाह आणि कोंकणीतल्या कथा : काल आणि आज’ या विषयावर शैलेंद्र मेहता, ग्वाडालुप डायस आणि सोनाली चोडणकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘लोकशाहीत समानता केवळ नावापुरतीच?’ या विषयावर अन्वेषा सिंगबाळ, प्रशांती तळपणकर, डॉ. सीमा सालगावकर, डॉ. प्रतीक्षा खलप आणि राजश्री नागेसकर यांचे चर्चासत्र होणार आहे.
यानंतर नमन धवस्कर, सुलोचना पेडणेकर यांच्यासह अन्य सहभागींच्या उपस्थितीत खुल्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप समारंभाला पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या नॉर्मा अल्वारेस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोंकणी भाषा मंडळ आणि शासकीय महाविद्यालय, खांडोळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.



