गोवादेश/जग

‘मतचोरी’च्या आरोपावरून राहुल गांधींचा मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमारांवर निशाणा

मडगाव : देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर रविवारी जोरदार टीका केली. देशात मतचोरीचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणात काँग्रेस माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


गोव्यातील मडगाव येथे काँग्रेसच्या ‘गोय राखोन यात्रा’दरम्यान आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार हा केवळ राजकीय मुद्दा नसून, संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाशी संबंधित प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.


‘ज्ञानेश कुमार योजना राबवतात, अमित शहा अंमलबजावणी करतात’

निवडणूक यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यातील कथित संबंधांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले. ‘ज्ञानेश कुमार मतचोरीची योजना राबवतात, अमित शहा तिची अंमलबजावणी करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करतात,’ असा दावा त्यांनी केला.

मतचोरीच्या कथित प्रकारांविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे सांगताना त्यांनी संविधानाचे संरक्षण करणे हे पक्षाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. मतदारांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


‘माझ्यावर ४५ हून अधिक मानहानीचे खटले’

आपल्याविरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्यांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘माझ्यावर ४५ हून अधिक मानहानीचे खटले दाखल आहेत. तरीही मी प्रत्येक व्यासपीठावरून मतचोरीबाबत बोलत आहे. मग या आरोपांवरून माझ्याविरोधात स्वतंत्र गुन्हा का दाखल केला जात नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मतचोरीच्या आरोपांवरून आपल्याविरोधात कायदेशीर कारवाई झाल्यास संबंधित प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आणि त्यातून सत्ताधाऱ्यांची अडचण होईल, अशी भीती त्यांना वाटत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.


निवडणुकीतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार आणि निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचे काँग्रेसने सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील सभेतून राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवरील टीकेची धार अधिक तीव्र केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!