
तनिष्कचे ‘अध्यंतरा’ कलेक्शन; तृप्ती डिमरी ब्रँड फेस
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तनिष्क या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने ‘अध्यंतरा’ हे नवे दागिन्यांचे कलेक्शन सादर केले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सादर करण्यात आलेल्या या कलेक्शनच्या विशेष जाहिरात मोहिमेत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकली आहे. विश्वाचे अथांग सौंदर्य, खगोलीय आकृत्या आणि प्रकाशाच्या विविध छटांपासून प्रेरणा घेतलेल्या या कलेक्शनमध्ये पारंपरिक भारतीय कारागिरी आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम साधण्यात आला आहे.
‘अध्यंतरा’ या कलेक्शनची संकल्पना विश्वातील गूढता आणि सौंदर्य यांच्याशी जोडलेली आहे. प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व हे स्वतःमध्येच एका स्वतंत्र विश्वाप्रमाणे असते, या विचारातून या कलेक्शनची निर्मिती करण्यात आली आहे. स्त्रीचे आंतरिक सामर्थ्य, आत्मविश्वास, सौंदर्य आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू दागिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
तृप्ती डिमरीच्या सहभागातून साकारलेली जाहिरात मोहीम या संकल्पनेला दृश्यात्मक स्वरूप देते. खगोलीय प्रेरणा आणि दागिन्यांचे सौंदर्य यांची सांगड घालत या मोहिमेची मांडणी करण्यात आली आहे. तृप्तीची आधुनिक शैली आणि व्यक्तिमत्त्वातून आजच्या भारतीय स्त्रीचा आत्मविश्वास व स्वतंत्र दृष्टिकोन अधोरेखित करण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे.
तनिष्कच्या मुख्य विपणन अधिकारी पेल्की त्शेरिंग यांनी सांगितले की, धनत्रयोदशी हा समृद्धी, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. ‘अध्यंतरा’च्या माध्यमातून विश्वाचे आकर्षण आणि त्यातील गूढ सौंदर्य स्त्रीच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक स्त्री ही अनेक पैलूंनी समृद्ध असलेले एक स्वतंत्र विश्व आहे, ही या कलेक्शनमागील मध्यवर्ती कल्पना आहे. भारतीय कारागिरीचा वारसा आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा मेळ या दागिन्यांत साधण्यात आला आहे.
तनिष्कच्या डिझाइन विभागाच्या प्रमुख गरिमा माहेश्वरी यांनी सांगितले की, या कलेक्शनसाठी खगोलीय आकृत्यांची हालचाल, प्रकाशाचा खेळ आणि विश्वातील गुंतागुंत यांपासून प्रेरणा घेण्यात आली. या कल्पना दागिन्यांच्या आकारांत आणि सूक्ष्म कारागिरीतून साकारण्यात आल्या आहेत. पेटंटप्राप्त त्रिमितीय (३डी) ग्लास कुंदन तंत्र, हाताने कोरलेले खडे आणि इनॅमल तंत्राचा वापर हे या कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे.
विश्वाच्या अमर्याद सौंदर्याला आधुनिक दागिन्यांच्या माध्यमातून अभिव्यक्त करताना पारंपरिक कलाकुसर आणि नावीन्य यांचा समतोल साधण्यावर या कलेक्शनमध्ये भर देण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात आधुनिक भारतीय स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दागिने सादर करण्याच्या उद्देशाने ‘अध्यंतरा’ची निर्मिती करण्यात आली आहे.





