सिनेनामा 

IFFI 2026 : ‘गोवा विभागा’त १२ चित्रपटांची निवड

गोमंतकीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ; ३५ प्रवेशिकांमधून परीक्षक मंडळाची निवड

पणजी : ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘स्पेशल गोवन सेक्शन’ या विशेष विभागासाठी १२ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. फिचर आणि नॉन-फिचर अशा दोन्ही प्रकारांतून आलेल्या एकूण ३५ प्रवेशिकांमधून या चित्रपटांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ‘अँसेसांव’ या चित्रपटाला या विभागाच्या उद्घाटनाचा मान मिळाला आहे. गोव्यातील चित्रपटकर्मींना आपले काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) उपाध्यक्ष दिलायला लोबो यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली.

या विभागासाठी चित्रपटांची निवड करण्यासाठी दिग्दर्शक ओम राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि जादुमोनी दत्ता हे या मंडळाचे सदस्य होते.

‘स्पेशल गोवन सेक्शन’मधील १२ चित्रपट

या विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे :

१. अँसेसांव (Ancessao)

२. पूर्णता (Purnata)

३. उमेश (Umesh)

४. शकुंतला (Shakuntala)

५. मीडियम पीस (Medium Piece)

६. वुडवर्म (रोटो) (Woodworm – Roto)

७. नॉईज (Noise)

८. दर्या (Daryaa)

९. चिअर्स! (Cheers!)

१०. परफेक्ट शॉट (Perfect Shot)

११. बापो काळे (Bapo Kale)

१२. हेल्थ सेंटर (Health Centre)

या चित्रपटांच्या निवडीमुळे गोव्याच्या स्थानिक चित्रपटसृष्टीतील विविध कथा, विषय आणि कलात्मक अभिव्यक्तींना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. विशेष विभागात समावेश झालेल्या चित्रपटांचे प्रदर्शन देश-विदेशातील चित्रपटप्रेमींसमोर होणार असल्याने गोमंतकीय चित्रपटकर्मींना आपले काम अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल.

२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान इफ्फीचे आयोजन

दरम्यान, ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यंदा २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ (सीमांच्या पलीकडील कथा) ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातील दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि चित्रपटप्रेमी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

यंदाच्या महोत्सवात २३० हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार असून, त्यामध्ये ८६ देशांतील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट प्रदर्शनांसोबतच चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी संवाद, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेक्षकांसाठी विशेष उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या ५६ वर्षांपासून इफ्फीने आशियातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. जागतिक दर्जाच्या चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध देशांच्या संस्कृती, भाषा आणि सामाजिक वास्तवाची ओळख करून देण्यात या महोत्सवाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्फीचे आयोजन केले जाते. गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) ही महोत्सवाची नोडल संस्था म्हणून आयोजनाची जबाबदारी सांभाळते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!