गोव्याच्या AVGC-XR क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावरील संधी; IICT सोबत सामंजस्य करार
पणजी : गोव्यातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी (AVGC-XR) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी गोवा AVGC-XR असोसिएशनने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे गोव्यातील या क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि उद्योगाशी संबंधित नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या कराराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला IICT चे संस्थापक संचालक आणि फिक्की AVGC-XR फोरमचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, IICT चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवसकर, गोवा AVGC-XR असोसिएशनचे अध्यक्ष तपन आचार्य आणि जपानच्या वॅकॉम कंपनीचे भारतातील प्रमुख राजीव मलिक उपस्थित होते.
IICT ही भारत सरकारच्या पुढाकारातून स्थापन झालेली राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टता संस्था आहे. महाराष्ट्र सरकार तसेच फिक्की (FICCI) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांसारख्या औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने या संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी या क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ घडविणे, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, तसेच शैक्षणिक प्रशिक्षण आणि उद्योगांच्या गरजा यांमधील अंतर कमी करणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या सामंजस्य करारांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी, विकास आणि अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याबरोबरच गोव्यातील क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रातील व्यावसायिकांना राष्ट्रीय स्तरावरील संधींशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
IICT ने नेटफ्लिक्स, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, अॅडोबी, मेटा आणि जिओस्टार यांसारख्या जागतिक उद्योगसमूहांशी सहकार्य प्रस्थापित केले आहे. तसेच ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या शैक्षणिक संस्थेशीही भागीदारी केली आहे.
गोव्यातील AVGC-XR क्षेत्राला देशातील वाढत्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी परिसंस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सहकार्यामुळे व्यावसायिक प्रशिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योगक्षेत्राशी समन्वय वाढण्यास मदत होईल. तसेच क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून गोव्याची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे.







