जस्टिन बीबरला झाला ‘हा’ दुर्मिळ आजार
न्यूयॉर्क:
हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर काही काळासाठी सुट्टीवर गेला आहे आणि तो कॉन्सर्ट करणार नाहीये. सतत कॉन्सर्ट करणारा जस्टिन आता काही काळ विश्रांती घेणार आहे. याचं कारण म्हणजे त्याला एक दुर्मीळ आजार झाला आहे. 28 वर्षीय जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला पार्श्यल पॅरालिसिस झाला आहे.
जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) हा दुर्मीळ आजार झाल्याचं निदान झाल्याचं त्याने सांगितलं आहे. यामुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला पॅरालिसिस झालाय. त्याने व्हिडिओत याबद्दलची माहिती दिली असून, चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलंय. इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून जस्टिन बीबरने चाहत्यांना तो त्याचा कॉन्सर्ट शो का रद्द करत आहे, याबद्दल सांगितलं.
व्हिडिओमध्ये जस्टिन म्हणतो, ‘मला हा आजार एका व्हायरसमुळे झाला आहे. त्याने माझ्या चेहऱ्याच्या नर्व्ह्जवर हल्ला केला आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस (face paralysis) झाला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या एका डोळ्याची पापणी लवत नाही.
मला या बाजूने हसताही येत नाही आणि या बाजूची माझी नाकपुडीही हलत नाही.’ जस्टिन बीबरने येत्या काळातले काही शोज रद्द केल्याने त्याचे चाहते खूप नाराज झाले होते. त्यांच्यासाठी खास मेसेज देत जस्टिन म्हणाला, की तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलंय. व्हिडिओत तो म्हणाला, ‘ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता.
असं व्हायला नको होतं, असं मला वाटतं; पण माझं शरीर मला थोडं थांबून आराम करायला सांगतंय. मला आशा आहे, की तुम्ही समजून घ्याल. पुढचा काही वेळ मी विश्रांती आणि आराम करणार आहे, जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊ शकेन आणि परत येऊन मी ते करीन, ज्यासाठी माझा जन्म झालाय.’