प्रसिध्द दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
मुंबई:
सिनेदिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. आज २४ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. सरकार यांनी परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ते गेले काही दिवस डायलिसिसवर होते आणि त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे ३ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरकार यांच्या निधनाची बातमी सिनेसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली असून दिग्दर्शकाच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
अभिनेत्री नीतू चंद्राने ‘परिणीता’ फेम दिग्दर्शकाच्या निधनाची पुष्टी केली. प्रदीप सरकार हे तिचे पहिले दिग्दर्शक होते, तिने महाविद्यालयात असतानाच एका फुटवेअर ब्रँडच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शकासोबत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. नीतू आणि सरकार यांची बहीण मधु या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. यामुळे प्रदीप सरकार यांच्या निधनाची बातमी जेव्हा नीतूला कळली तिला फार मोठा धक्का बसला.