‘वाहतूक विभागाने आपल्या कर्मचार्यांना आठवड्यातून एकदा तरी बस प्रवास अनिवार्य करावा’
पणजी:
कदंब बसेसमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांना उशीर होत असून केवळ सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी यामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील आप सरकारप्रमाणेच, गोवा सरकारनेही सामान्य नागरिकांना होणारा हा विलंब दूर करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी कदंब महामंडळ आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना, आठवड्यातून एकदा तरी बसने प्रवास करणे बंधनकारक करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
आप गोवाच्या उपाध्यक्ष आणि आप युवा शाखेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी महिलांसाठी खास ‘पिंक बसेस’ सुरू करण्याची मागणी केली आहे. जुन्या कदंब बसेसमध्ये कदंब चालकांना सीट बेल्ट नसल्याचा उल्लेखही रॉड्रिग्स यांनी यावेळी केला. “केटीसीएल कर्मचार्यांसाठी सुरक्षा उपाय कुठे आहेत”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बुधवारी पक्षाच्या पणजी कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना रॉड्रिग्स म्हणाल्या, की “दिल्लीतील वाहतूक महामंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांना, आठवड्यातून एकदा तरी डीटीसी बसने प्रवास करण्यास सांगितले आहे, जेणेकरून दिल्ली वाहतूक महामंडळाची व्यवस्था आणि सुविधांबाबत त्यांना कर्मचाऱ्यांकडूनच प्रतिक्रिया मिळतील”.
दिल्ली सरकारने कर्मचाऱ्यांना बसेसमधील स्वच्छता आणि देखभाल, बसमध्ये मार्शलची उपलब्धता, ड्रायव्हर आणि कंडक्टरची वागणूक, ड्रायव्हरकडून बस लेनच्या शिस्तीचे पालन, नियुक्त बस स्टॉपवर बस थांबविणे, अतिवेगाने चालवणे/ चालकने ओव्हरटेक करणे आणि वेळेवर बस उपलब्ध असणे, यासारख्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितल्या आहेत, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास उपलब्ध करून देऊनही, आप सरकारच्या डिटीसी ने दिल्लीत नफा कमावला आहे. तर गोव्यात मात्र गेल्या १० वर्षात केटीसीएल ला १०० कोटी रु. पेक्षा जास्त नुकसान झाले आहे, असा टोला आप युवा शाखेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी लगावला.
२०१९ मध्ये केटीसीएल चा महसूल सुमारे २०० कोटी होता. २०२० मध्ये तो सुमारे २०४ कोटींवर पोहोचला आणि २०२१ मध्ये तो १५० कोटींवर घसरला. २०१९ मध्ये केटीसीएल चा खर्च सुमारे २२४ कोटी होता, २०२० मध्ये ते २१७ कोटी होता तर २०२१ मध्ये खर्च १५८ कोटी झाला. यावरून केटीसीएल ला २०१९ मध्ये २३ कोटी रुपये, २०२० मध्ये १२ कोटी आणि २०२१ मध्ये ७.५ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती भगत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही कदंबा बसेसमध्ये बिघाड होत आहे. सध्याच्या बसेसची देखभाल करण्यास सरकार असमर्थ असूनही, राज्य सरकार सुमारे १,२०० इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्राकडे लॉबिंग करण्याच्या प्रयत्नात आहे.
जर खासगी बसेसना आरटीओद्वारे वार्षिक फिटनेस चाचणी पास करणे आवश्यक आहे, तर ते कदंबला का लागू होत नाही? जर ते बसेसची फिटनेस चाचणी करत असतील, तर या बसेसमध्ये बिघाड का होत आहे?, असा सवाल भगत यांनी केला.
याशिवाय, आप गोवा चे युवा अध्यक्ष अॅड. अनूप कुडतरकर यांनी केटीसी बसेसवरील पान मसालाच्या सर्व जाहिराती तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी केली, असे न झाल्यास आप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे त्यांनी सांगितले.
कुडतरकर म्हणाले, की “पान मसाला जाहिरात ही गुटख्याची सरोगेट जाहिरात आहे, ज्याच्या विक्रीवर बंदी आहे. अशा जाहिराती असलेल्या केटीसी बसेस, लोकवस्तीच्या भागात तसेच ग्रामीण भागात फिरतात. अशा असंख्य बसेस कुजिरा शैक्षणिक संकुलात दिसतात, जिथे पणजीतील चार प्रमुख शाळा असून, तिथे हजारोच्या संख्येने मुले शिक्षण घेत आहेत.”
“पान मसाल्याच्या जाहिराती बॉलीवूड सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेते करतात, ज्यांचा चाहता वर्ग आणि फॉलोअर्स विशेषत: लहान मुले आणि तरुणांमध्ये आहेत. मुले आणि तरुण अशा पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांचे अनुकरण करून, सेवन करतील हे नाकारता येत नाही”, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.