प्राणघातक हल्ल्यात शिंजो आबे यांचे निधन
नारा:
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झालं आहे. जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्सने आबे यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं म्हटलं आहे.
सकाळी आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलीय.
आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते,” असं एनएचकेने म्हटलं आहे. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.