६७ टक्के गोमंतकीय जनता भाजपच्या विरोधात : अमित पाटकर
पणजी :
भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पुढील लोकसभा निवडणुकीसंबंधी विरोधकांच्या ताकदीसंबंधी केलेल्या वक्तव्यात अहंकार आहे. ६७ टक्के गोमंतकीय जनता भाजपच्या विरोधात आहे आणि डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार पक्षांतर करणाऱ्या गद्दारानी भरलेले आहे, हे तानावडेनी लक्षात ठेवायला हवे, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.
काल जाहिर झालेल्या निकालाप्रमाणे पोटनिवडणुकीत भाजपने दोन जिल्हा पंचायतीच्या जागा केवळ राखल्या आहेत. यात साजरे करण्यासारखे काही नाही. डबल इंजिन सरकारच्या तथाकथित विकासाबद्दल तानावडेना एवढा विश्वास असेल तर त्यांनी आठ फुटीर आमदारांना राजीनामे देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची हिंमत का दाखवली नाही? त्यांनी कुठ्ठाळीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास उमेदवाराला का सांगितले नाही? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.
मी सदानंद तानावडे यांना आवाहन करतो की, त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आपला अहंकार दाखवावा आणि भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गोव्यातील पात्र बेरोजगार तरुणांना ५० हजार नोकऱ्या देण्यास भाग पाडावे. तानावडेनी आपली शक्ती वापरून भाजप सरकारनला समाज कल्याण लाभार्थ्यांना मासिक मदत वेळेत जारी करण्यास भाग पाडावे. भाजप अध्यक्षांनी आपला उद्धटपणा मंत्र्यांसमोर वापरावा आणि भाजप सरकारचे ‘मिशन कमिशन’ धोरण बंद करुन गोवा भ्रष्टाचार मूक्त करावा, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
आठ आमदारांच्या पक्षांतरानंतर भाजप नेतृत्व अहंकारी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदानंद तानावडे यांना जिल्हा पंचायत पोट निवडणुकीचे निकाल हे सदर पक्षांतराला लोकमान्यता असल्याचे वाटते हे दुर्दैव आहे. पक्षांतर करणाऱ्यांनी केवळ जनतेचा विश्वासघातच केला नाही तर देवाचाही अवमान केला आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोव्यात भाजपने सत्तेत आल्यापासून नेहमीच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. डबल इंजिन सरकार गोव्याला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. जनता त्यांना धडा शिकवेल असे अमित पाटकर म्हणाले.