google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवालेख

पोर्तुगीजकालीन गोव्यातील स्वच्छतेचे ‘हे’ कायदे तुम्हाला माहित आहेत का?

आपण कोणत्याही रस्त्याने किंवा महामार्गावरून प्रवास करत असताना आपण पाहतो की लोक कचर्‍याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन ठिकाणी नद्यांमध्ये फेकतात आणि त्याबद्दल कोणीही काहीही करू शकत नाही. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी हतबल आहेत. सुशासन, सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे पंचायत आणि नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छतेची समस्या ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या आहे. 17 व्या शतकात पोर्तुगीज – गोवा येथे सेनादो दे गोवा किंवा गोव्याची सिनेट होती जी आशियातील पहिली नागरी संस्था होती. या सिनेटच्या कायद्यांचे व नियमांचे कठोरपणे पालनही केले जायचे. आजकाल आपण स्वच्छतेविषयीचे कायदे खुंटीला टांगून सगळीकडे घाण करत सुटलो आहोत.

गोव्यातील ऐतिहासिक अभिलेखागारात, लिव्हरो द पोश्‍तुराज या नावे खंड क्र. 7795 आहे. यात 1618 साली तयार करण्यात आलेले कायदे व नियम आहेत. हेच कायदे, नियम पुढील शतकातही काही नगण्य बदलांसह सुरू राहिले.बाजार निरीक्षक आणि न्यायाधीशांना सूचना, कर, परवाने, मोजमाप आणि वजन, बाजार नियंत्रणावरील शाही सनद आणि 1801 ते 1834 या कालावधीतील सिनेटच्या कार्याचा उल्लेखही यात आहे. महापालिका मंडळाचे आदेश आणि दिलेल्या संमतींचा उल्लेख आहे. इथे एक गमतीची गोष्ट आढळते ती दंड आकारणीबाबत. कुणालाही दंड झाल्यास, दंडाची अर्धी रक्कम नगरपरिषदेकडे जात असे आणि उरलेली अर्धी रक्कम सामान्यतः आरोपकर्त्याला दिली जात असे.

स्वच्छतेचा कायदा, मांस, मासे, स्वच्छ करणारा, निसणा, मेणबत्ती बनवणार्‍यांसाठी असलेले आणि बंदिवान गुलामांसाठी असलेले कायदे यांचा आज अभ्यास केल्यास खूप मनोरंजन होते आणि मनोबोधही होतो. या लेखात यांपैकी काही मनोरंजक कायद्यांचा आपण आढावा घेऊ…

पार्दोश, रेस आणि शेराफिन या तत्कालीन चलनाप्रमाणे दंड आकारणी केली जाई. दि. 3 नोव्हेंबर 1618 रोजी स्वच्छता कायदा संमत करण्यात आला, ज्यानुसार ज्या ठिकाणी 1000 रेसच्या दंड निश्चित केला आहे, अशा जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोणीही काढलेला केर, घाण आणि इतर कचरा टाकू शकत नसे. गुलामाला त्याच गुन्ह्यासाठी चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाई. ‘से चर्च’ किंवा इतर कोणत्याही चर्चमध्ये, आवारात किंवा तत्कालीन रुआ द दिरेता (जुन्या गोव्यातील रस्ता) या ठिकाणी कचरा फेकणार्‍याला 5 पर्दाओस दंड आकारला जाई. पावसाळ्यात कोणीही गोदीत शेण, घाणेरड्या वस्तू इत्यादी फेकल्यास त्याला 1000 रेस दंड भरावा लागे आणि इतकेच नव्हे गोदीची स्वच्छताही स्वखर्चाने करावी लागे.

Portuguese Houses in Fontainhas in Panaji

त्याच कायद्यान्वये सान्ता डोमिंगोस आणि एस. पॉलोच्या शहराच्या दिशेने असलेल्या बाहेरील भिंती आणि उपनगरांमधील रस्त्यांवरून दिवसा किंवा रात्रीच्या वेळी डुकरांना शहराच्या दिशेने आणि दीवच्या जुन्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या रॉड्रिगो मॉन्तेरोच्या घरापर्यंत जाण्यास बंदी होती. याचे उल्लंघन करणार्‍या डुकरांना मारून खाण्याची परवानगी त्या भागातील सर्वांना होती. डुकरांना जीवदान द्यायचे असल्यास, डुक्करमालकाला डुकराएवढी रक्कम किंवा 200 रेस दंड आकारला जाई. त्याशिवाय उल्लंघन केल्याचा अतिरिक्त दंड म्हणून २ शेराफिन डुक्करमालकाला भरावे लागत. किल्ल्यांच्या खाडीत घाणीचे भांडे कोणीही नेऊ शकत नसे. असे करणार्‍यास 5 पार्दांव इतका दंड भरावा लागे आणि जर ही भांडी पूर्णपणे झाकली गेली नाहीत तर एक तोस्तावचा दंड भरावा लागे.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते ऑक्टोबरपर्यंत नाले उघडे ठेवण्यास परवानगी असे. थकबाकीदारांना त्यांची पहिलीच खेप असल्यास 1,000 रेस आणि त्यानंतरही पुन्हा थकबाकी ठेवल्यास 2,000 रेसच्या दंडाला सामोरे जावे लागे. कोणत्याही रस्त्यावर, चौकात आणि वस्तीच्या ठिकाणी कोणीही खत आणि घाण टाकू शकत नसे. वाहून न्यायचे झाल्यास ते रात्रीच्या वेळी वाहून नेले जाऊ शकत नसे. परंतु सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ठरावीक ठिकाणांवरून त्याची ने-आण करण्यास परवानगी होती. या नियमाचे उल्लंघन करणार्‍यास 1000 रेस दंड भरावा लागे.

एस. डोमिंगो व ‘बेंगानी’ या कारंज्यांच्या उडणार्‍या पाण्यात, तसेच फळबागांमध्ये कपडे धुण्यास मनाई होती. येथे कपडे धुतल्यास 5 पार्दोशचा दंड ठोठावला जाई. दुर्गंधी आणि धुरापासून बचाव करण्यासाठी शहरातील गल्ल्या, उपनगरे आणि बाजारांमध्ये मासे तळण्यास बंदी होती. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 2 पार्दोश इतक्या दंडाची तरतूद होती.. रस्त्यावर किंवा शहरातील अनधिकृत ठिकाणी विक्रीसाठी कोणीही मासे मोजू शकत नसे किंवा त्यांना मीठ लावू शकत नसे. असे कृत्य करणार्‍यास 1000 रेस दंड आकारला जाई. असे असले तरी, निवासी घरासमोर असे करण्यास परवानगी असे. पण, मासे स्वच्छ केलेले पाणी टाकल्यास किंवा मासे टाकल्यास तितकाच दंड आकारला जाई.

घरात व इतर सार्वजनिक ठिकाणी कातडी सोलण्यास मनाई होती. दुर्गंधी पसरू नये म्हणून जनावराचे कातडे लपवून ठेवणार्‍यास 20 पार्दोशचा दंड ठोठावला जाई. शहराच्या भिंतींच्या आत आणि बाहेर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी करण्यास मनाई होती. विशिष्ट रस्त्यांवर वस्तू विकता येत नव्हत्या. फळे आणि पावासारख्या काही वस्तू सिमाओ डायसच्या रस्त्यावर, फिश मार्केटकडे किंवा सँटो अँटोनियोच्या टेरेसच्या क्रॉसजवळ विकल्या जाऊ शकत नव्हत्या.

टेबल, पेटी, शवपेटी, ताबूत इत्यादींसारख्या कोणत्याही वस्तू रुआ दिरेतामध्ये विकल्या जाऊ शकत नसत, जिथे त्यांचा लिलाव होत असे. जर अपराधी पोर्तुगीज असेल, तर त्याच्या वस्तूंच्या नुकसानाव्यतिरिक्त, पहिल्या खेपेस 5 परदोस आणि दुसर्‍या खेपेस 10 पार्दोश दंड आकारला जाई. अपराधी स्थानिक ख्रिश्चन किंवा अन्य कोणी असल्यास पहिल्या खेपेस पकडल्यास दंड 1 पार्दोश आणि दुसर्‍यांदा पकडल्यास 2 पार्दोश दंड आकारला जाई.

कुत्रे, मांजर मेल्यास त्याचे दफन कसे करावे, याविषयीही कडक कायदे होते. जेथून दुर्गंधी येणार नाही अशा ठिकाणी उपनगरापासून दूर असलेल्या डोंगरावर मृत मांजर किंवा कुत्रा पुरावा लागे. उपनगराजवळच पुरलेल्या पाळीव प्राण्याच्या प्रेतास दुर्गंधी सुटल्यास, त्या प्राण्याच्या मालकाला ५०० रेस दंड आकारला जाई. मेलेल्या घोड्यांचे मांस खाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी मेलेल्या घोड्यांच्या कातड्याची विक्री दुकानातून करण्यासही बंदी घालण्यात आली होती.

किरकोळ विक्रेत्यांनी मासळीच्या किमती अवाजवी वाढवू नयेत यासाठी मासळीच्या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्यामुळे परवानाधारक वगळता इतर सर्वांनी थेट मच्छीमारांकडून मासे विकत घेण्यास, मांडवी व सांता कॅथरीनाच्या बाजारात आणण्यासही मनाई करण्यात आली होती. या कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यास नेमस्त दंडाशिवाय तीन गळ्यात मासे बांधून चाबकाचे फटके खावे लागत. वर नोकरीही गमावून बसावे लागे. गरिबांना वाजवी दरात मासे उपलब्ध करून देण्यासाठी, सर्वांना मच्छीमार किंवा किरकोळ विक्रेत्यांकडून सर्व प्रकारचे खारट किंवा कोरडे मासे विकत घेण्याची आणि त्यांची बाजारात किंवा रस्त्यावर मुक्तपणे पुन्हा विक्री करण्याची परवानगी होती. ही परवानगी बंदिवान असलेल्या गुलामांनाही होती. बेटे, नद्या आणि समुद्रकिनारे अगदी सामान्यांसाठी मासेमारी करण्यास खुले ठेवले जात.

महामार्ग आणि त्यावरील पथदीप यांच्याबाबतीत नियम होते, गुलामांसाठी कायदा होता. चौधरीन (रोजंदारीवर माडाची काळजी घेणारा) यांच्यासाठी कायदा होता. पाव, ब्रेडवरील कायदा, स्थानिक मदिरा (किण्वित), पोर्तुगीज मद्य यांसाठीही कायदा होता. वैद्य, औषधविक्री यावर कायदा होता. इतर असे अनेक कायदे होते. व्यवस्था म्हटली की, कायदे असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. कायदे फक्त कागदापुरतेच मर्यादित नसून त्यांचे पालनही केले जाते याची खात्री लोकांना होती.

कुणी या कायद्यांविषयी, त्यातील मनोरंजक बाबींबद्दल लिहिल्यामुळे ‘पोर्तुगीजधार्जिणी’, असल्याचे लेबल लावू शकतात. हरकत नाही. पण, पोर्तुगिजांची भलामण करणे हा माझा हेतू नाही. कायदे पारतंत्र्यातही होते आणि आताही आहेत. फक्त एका गोष्टीचा अभाव जाणवतो, ती म्हणजे कायद्याची भीती. पारतंत्र्यात असलेली कायद्याची भीती, दरारा स्वातंत्र्य मिळाल्यावर कुठे गेला?

‘स्वच्छ भारत, स्वच्छ गोंय’ ही घोषणा फक्त फोटो काढण्यापुरती मर्यादित राहू नये. आमच्या आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी आम्हीच केलेल्या नियमांचे पालन आम्ही पळवाटा न काढता करावे, हाच लेखामागील स्वच्छ हेतू. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

(गोमंतकमधून साभार  )

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!