‘घरपट्टीच्या सुनावणी प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्या’
सातारा (महेश पवार) :
सातारा शहरातील नागरिकांना घरपट्टीच्या नोटीसा अजूनही प्राप्त झाल्या नाहीत . शहरात राबविण्यात आलेल्या चतुर्थ वार्षिक पाहणीत गंभीर त्रुटी असून त्याचा फेर सर्वे करावा तो पर्यंत घरपट्टी अपिलांच्या सुनावणीच्या तारखा मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करून घरपट्टी आकारणी प्रक्रिया पुढील सर्वसाधारण सभा अस्तित्वात येईपर्यंत स्थगित ठेवावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे केली . साताऱ्यात अनियमित होणारी रस्ते खुदाई व हद्दवाढीच्या नव्या भागात असणारा पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्यांवरून शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन तक्रारींचा पाढाच वाचला . समाधीचा माळ महादरे मोरे कॉलनी इं भागांमध्ये शिपायांच्या मार्फत चतुर्थ वार्षिक पाहणी झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला . नागरिकांना घरपट्टीची बिले वेळेत पोहोचली नाही मग सुनावणीची घाई कशासाठी ? असा थेट सवाल मुख्याधिकाऱ्यांना शिवेंद्रसिंहराजे यांनी केला . शहरातील भुयारी गटार योजनेसाठी मनमानी पध्दतीने होणाऱ्या रस्ते खुदाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,टेंडरसाठी मुख्याधिकारी यांना पुण्यापर्यंत बोलावलं जातं मग अन्यायकारक घरपट्टीसाठी का नाही असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर टीका केली आहे. सोयीचे टेंडर व सोयीचे ठेकेदार यासाठी स्वच्छता कामगार पुन्हा कामावर घेतले जात नाहीत मग नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कुठे आहेत त्यांची ही जवाबदारी नाही का ? असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी केला . जर राज्यपाल बदल हवा असेल तर आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन बसावे त्यासाठी महाराष्ट्रात मोर्चे काढून उपयोग काय ? राजकारणात काही गोष्टी संयमाने घ्याव्या लागतात आपले म्हणणे मान्य करण्यासाठी प्रत्येक राजकीय दबाव तंत्राचा वापर करायचा हे योग्य नाही . देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत महापुरूषांच्या अवमानकारक विधानासंदर्भात ते निश्चित सर्वांना समज देतील.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले साताऱ्यातील शहरात सध्या घरपट्टी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या घरपट्टीच्या विरोधात आज मुख्याधिकारी अभिजित बापट यांना ही प्रक्रिया थांबवावी म्हणून निवेदन दिले आहे. मात्र बापट यांच्या अधिकार क्षेत्रात हा विषय नाही . अपिल सुनावणी ही अशासकीय सदस्य नसल्याने बेकायदेशीर होऊ शकते त्यामुळे त्यांनी सुनावणीच्या तारखा स्थगित कराव्यात . घरपट्टी निर्णय प्रक्रियेला आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून स्थगिती आणू . घरपट्टी ही आजचा विषय नाही . घाईघाई प्रेस नोट काढणाऱ्यांनी सातारकरांच्या तोंडाला पाने पुसु नये . घरपट्टीच्या संदर्भात निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.