‘निवडणुकीची चाहूल लागताच नारळफोड्या गॅंग पुन्हा सक्रीय’
सातारा (महेश पवार):
गेले पाच वर्ष टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि घंटागाड्यांचे हफ्ते असा एक कलमी कार्यक्रम राबवून सत्ताधाऱ्यांनी पालिकेची अक्षरशः लूट केली. तीन-चार महिन्यापूर्वी पालिकेची निवडणूक लागणार असे दिसताच सत्ताधाऱ्यांनी शहरात नारळ फोडण्याचा धडाका लावला पण, निवडणूक पुढे ढकलल्याचे जाहीर होताच सत्ताधारी आघाडीचे नेते नेहमीप्रमाणे गायब झाले. आता पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि साताऱ्यातील नारळफोड्या गॅंग पुन्हा सक्रिय झाली. पालिकेचे कामकाज निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चाले काय? असा खोचक सवाल उपस्थित करतानाच सुज्ञ सातारकर नागरिक निरोपाचा नारळ देऊन गॅंगला घरी बसवतील, असा टोला आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून, सातारकरांना भावनिक करून सातारा विकास आघाडीने पालिकेची सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा करणाऱ्यानीच पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले. गेल्या पाच वर्षात कमिशन, टक्केवारी, टेंडर आणि घंटागाडीचे हफ्ते यासाठी सत्ताधाऱ्यांनी एकमेकांचे गळे धरण्याचे प्रकार सातारकरांनी हताश होऊन पाहिले. गेल्या पाच वर्षात सातारकरांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी काडीचेही काम केले नाही. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरु होताच यांना सातारकरांचा पुळका आला आणि विकासकामे करण्याचा साक्षात्कार यांना झाला. राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून शहरात आणि हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात नारळ फोडण्याचा सपाटा यांनी लावला. काम नाही पण, प्रसिद्दी आणि नुसती हवा करायची, त्यामुळे नागरिकांनीच यांना नारळफोड्या गॅंग असे नामकरण केले.
स्वार्थी आणि सत्तांध सत्ताधाऱ्यांची कमाल म्हणजे निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्याचे जाहीर होताच हे नेहमीसारखे गायब झाले आणि आता निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे जाहीर करताच हे पुन्हा हजर झाले आणि नारळफोड्या गॅंग पुन्हा सक्रिय झाली. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण, सातारकरांना यांची खोड कळून चुकली आहे. निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्याने आता बैठक घेणे आणि न होणाऱ्या तसेच खाबुगिरीला उदंड वाव असणाऱ्या विकासकामांचा भडीमार करणे हा उद्योग सुरु झाला आहे. गंमत म्हणजे नगर पालिकेचा कारभार कोण चालवतंय, पालिका प्रशासन, मुख्याधिकारी चालवतात का निवडणूक आयोग चालवतय हेच सातारकरांना कळायला मार्ग नाही. कास धरणाच्या प्रकल्पामुळे पाचपट पाणीसाठा होणार आहे पण, त्याचा फायदा सातारकरांना होणार नाही. पाणीसाठ्याच्या क्षमतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकल्या असत्या तरच सातारकरांना मुबलक पाणी मिळाले असते. पण, सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणा आणि दुर्लक्षामुळे सातारकारांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. हि पाणीटंचाई नैसर्गिक नसून पालिकेने लादलेली पाणीटंचाई आहे. पालिकेच्या ढिसाळ, मनमानी आणि स्वकेंद्रित कारभारामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती सातारकरांवर ओढवली आहे.
सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच बैठक घेतली. पावसाळा तोंडावर आला असून सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. हे म्हणजे ठेकेदार मालामाल करणे आणि पैशाची उधळपट्टी करण्याचे धोरण आहे. बैठकीत नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना सक्रिय होण्याचा सल्ला दिला. म्हणजे गेले पाच वर्ष सत्ताधारी निष्क्रिय होते, झोपले होते याची एकप्रकारे कबुलीच यांनी दिली असून आता निवडणूक जवळ आली असल्याने सक्रिय झाले पाहिजे, असा फतवा हे काढणार, हे सातारकर ओळखून आहेत. सातारकरांना विकास हवा होता मात्र तुम्ही त्यांच्या आशा, अपेक्षांना सोनगावचा कचरा डेपो दाखवला आणि सातारा पालिकेला लुटून शहराला भकास करून टाकले. याची किमंत तुम्हाला निवडणुकीत मोजावी लागणार असून सातारकरच नारळफोड्या गँगच्या हातात नारळ देऊन या गॅंगला घरी बसवतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.