Covid19: देशात पुन्हा मास्क सक्ती?
नवी दिल्ली:
चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढतो आहे. त्यामुळे भारतानेही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मास्क लावणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर सर्वांनी सतर्क राहावं अशाही सूचना दिल्या आहेत.
मनसुख मांडवीय यांनी आज झालेल्या बैठकीची माहिती ट्विट करून दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी मास्क आवश्यक असल्याचं म्हटलं आहे त्यावरून देशात पुन्हा मास्क सक्ती होणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
मनसुख मांडवीय यांनी असं म्हटलं आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संपलेला नाही, आम्ही सर्वांना सतर्क राहण्यच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यानंतर नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोनाबाबत माहिती देताना हे लसीकरणावर भर दिला आहे. फक्त २८ टक्के नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची जास्त गरज असल्याचं पॉल यांनी बोलून दाखवलं.
ज्यांना पूर्वीचे आजार आहेत उदाहरणार्थ, मधुमेह, बीपी किंवा हृदयरोग हे ज्यांना आहेत अशा रूग्णांचा आढावा घेतला जाणार आहे. परदेशी जाऊन येणाऱ्या व्यक्तींची चाचणी करणं आवश्यक आहे असंही सांगण्यात आलं आहे. तर केंद्र सरकार दर आठवड्याला देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.