कोलकाता:
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी ( ८ मे ) ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर राज्यात बंदी घातली आहे. बंगालमधील सर्व थिएटर्समधील स्क्रीनवरून हा चित्रपट काढून टाकण्याचे आदेश मुख्य सचिवांना ममता बॅनर्जींनी दिले आहेत. या निर्णयानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
“द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचललं आहे,” असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.
“यापूर्वी ते ‘काश्मीर फाईल्स’ घेऊन आले होते. आता ही केरळचा विषय आणला आहे. नंतर ‘बंगाल फाईल्स’ची योजना आखण्यात येत आहे. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह बनवला असून, त्याद्वारे केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. ‘द केरला स्टोरी’ म्हणजे काय? तर ही विकृत कथा आहे,” अशी टीका ममता बॅनर्जींनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निर्माते विपुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ममता बॅनर्जींनी चित्रपटावर बंदी घातली असेल, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. कायद्याच्या तरतुदींनुसार आम्ही लढा देऊ,” असं विपुल शाहांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला तामिळनाडूतही बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने रविवारी ( ७ मे ) हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला विरोध आणि प्रेक्षकांचा मिळत नसलेला प्रतिसाद पाहून हा निर्णय घेतल्याचं तामिळनाडू थिएटर्स अँड मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. सुब्रमण्यम यांनी म्हटलं.