मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मोरपिर्ला विद्यालय गजबजले!
पणजी:
मोरपिर्ला सरकारी विद्यालयाची स्थिती दयनीय झालेली आहे. इमारतीची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना काल शाळेत पाठविले नव्हते.
माध्यमिक शाळेची आता काही प्रमाणात दुरुस्ती केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळेच्या दुरुस्तीचा आदेश दिल्याने पालकांनी आपल्या मुलांना आज शाळेत पाठविल्याचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले.
शाळा इमारत दुरुस्तीची वारंवार सरकार दरबारी मागणी करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी काल सोमवारी पालकांनी शाळेवर बहिष्कार घातला. ग्रामीण भागात असलेल्या या शाळेत किमान 99 टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असूनही दुर्लक्ष करणे म्हणजे त्या गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मारिया बार्रेटो यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘उत्कृष्ट शिक्षिका’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सतत आठ वर्षे 100 टक्के निकाल दिला आहे. अशा विद्यालयाची स्थिती दयनीय होणे ही लज्जास्पद गोष्ट असल्याचे पालकांनी सांगितले.