‘स्वातंत्र्य संग्रामाच्या मंदिरांचे आणि ऐतिहासीक स्थळांचे संरक्षण करा’
मडगाव :
डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाओ मिनेझिस यांनी गोवा मुक्ती चळवळीची ज्योत प्रज्वलित केली त्या लोहिया मैदान, मडगाव येथे गोवा क्रांती दिनाचे सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करणे महत्वाचे आहे. भाजप सरकारने स्वातंत्र्य संग्रामातील मंदिरे आणि ऐतिहासीक स्थळांचे संरक्षण केले पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
मडगाव येथे लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, विरोधी पक्षनेत्यांनी वारंवार आवाहन करूनही लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्वाची जागा म्हणून अधिसूचित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारला दोष दिला.
गोवा क्रांती दिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा आणि इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आज लोहिया मैदानावर डॉ. राम मनोहर लोहिया आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.
गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कृती करण्याचे आवाहन करतो. गुरूदास कुंदे यांनी पणजी येथे कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना वेळेवर पेन्शन आणि नोकऱ्या देण्यात भाजप सरकारचे अपयश उघड केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या खूणा नष्ट करू नका आणि आग्वाद तुरूंग आणि रेईस मागोस किल्ल्यांचे बारमध्ये रूपांतर करू नका अशी मागणी सरकारकडे केली असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
मला आनंद आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारच्या सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. काँग्रेस पक्षाने 18 जून 2021 रोजी याच लोहिया मैदानावर तीन रेखीय प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. गोवा अक्षय ऊर्जेवर टिकून राहू शकतो हे पंतप्रधानांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मी पर्यावरण विरोधी 3 रेखीय प्रकल्प रद्द करण्याच्या आमच्या मागणीचा पुनरुच्चार करतो, युरी आलेमाव म्हणाले.