पणजी:
माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदार म्हणून अन्यायकारक अपात्र ठरवल्याच्या विरोधात आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी गोवा प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलने करण्याचा ठराव घेतला आहे.
युवक काँग्रेसची नुकतीच राज्य कार्यकारिणीची बैठक इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यात राज्याच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच संघटना बांधणीवर मुख्य भर देण्यात आला.
गोवा प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश प्रभारी आणि भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव रिची भार्गव म्हणाल्या की, लोकशाहीचे रक्षण करण्याची गरज आहे.
“आम्ही 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करत आहोत, हे केवळ गोव्यासाठीच नव्हे तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत,” असे ती म्हणाली.
‘युवक काँग्रेसने या वर्षीच्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तशीच गोव्यातही महत्त्वाची भूमिका बजावली जाईल,‘असे रिची भार्गव म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, “आम्हाला खात्री आहे की दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा येथील दोन्ही लोकसभा मतदारसंघ यावेळी आम्ही जिंकणार.
देशाच्या चांगल्या भविष्यासाठी लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी युवकांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिची भार्गव यांच्यासह उपाध्यक्ष श्री. विवेक डिसिल्वा, गिना पॅरेरा, वैष्णव पेडणेकर, राज्य सरचिटणीस लिओविटा पॅरेरा डी आंद्राद्र, यश कोचरेकर आणि उबेदुल्ला खान उपस्थित होते.
दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष श्री. महेश नादर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष श्री. रिनाल्डो रुझारियो, राज्य सोशल मीडिया समन्वयक देवसुरभी यदुवंशी, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते.
’युवा जोडो बूथ जोडो’ अभियानांतर्गत बुथ स्तरावर संघटना बांधणीचा ठराव घेण्यात आला. या माध्यमातून 2024 च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाठिंबा मिळवण्यात युवकांची मोठी भूमिका असणार आहे.
याशिवाय राहुल गांधी यांच्या अन्यायकारक अपात्रतेच्या विरोधात आंदोलने करण्याचा ठराव व राज्यातील महागाई आणि प्रचंड बेरोजगारीविरोधातील निदर्शनेही घेण्यात येणार आहेत.
भाजपने लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी अलीकडेच जातीय समस्यां निर्माण केल्या आहेत, हे लक्षात घेऊन हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.