पणजी :
गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव गोव्यात दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत विविध आरोप केले. भाजपने षडयंत्र रचून या आमदारांना पक्षात सामिल करून घेतले. या आमदारांना पैसा, सत्ता आणि विविध सरकारी यंत्रणांची भिती दाखवून त्यांना पक्षांतराला भाग पाडले असा आरोप गुंडूराव यांनी केला. दिगबंर कामत (Digambar Kamat) आणि मायकल लोबो (Michael Lobo) हेच या पक्षांतराचे मास्टरमाईंड आहेत. लोबो यांना वाघ समजले होते पण ते तर उंदीर निघाले असा चिमटा देखील गुंडूराव यांनी लोबो यांना काढला.
गोव्यात काँग्रेसमधील आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव बुधवारी उशीरा रात्री गोव्यात दाखल झाले. गुंडूराव यांनी उरलेले काँग्रेस आमदार, प्रमुख नेते, कार्यालय प्रभारी यांची देखील भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दिनेश गुंडूराव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दिनेश गुंडूराव म्हणाले, दिगबंर कामत आणि मायकल लोबो (Michael Lobo) हे दोघेच या पक्षांतराचे मास्टरमाईंड आहेत. दिगबंर कामत (Digambar Kamat) यांनी पक्षांतर करणार नाही अशी मंदीरात शपथ घेतली. इतर आमदारांनी देखील चर्च, दर्गावर जाऊन पक्षांतर करणार अशी शपथ घेतली. पण त्यांनी देव आणि मतदारांशी प्रतारणा केली आहे. या आमदारांनी सत्ता, पैसा आणि आपल्या चुकीच्या कामासाठी हे पक्षांतर केले. आठ आमदारांना 30 ते 40 कोटी रूपये दिल्यात असा आरोप दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) यांनी केला.
काँग्रेसमधून कचऱ्याची दुसरी खेप बाहेर पडली अशा शब्दात गुंडूराव यांनी आठ आमदारांना संबोधले आहे. गुंडूराव म्हणाले, 2019 मध्ये काँग्रेसमधून कचऱ्याची पहिली खेप बाहेर पडली. आता दुसरी खेप बाहेर पडली आहे. पक्षांतर केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात स्थान देणार नाही, गोव्यातील काँग्रेसची पुर्नबांधणी केली जाईल. उरलेले काँग्रेसचे तीन आमदार गोव्यातील जनतेचे विषय नेहमीच मांडत राहिल असे गुंडूराव यांनी नमूद केले.