सहा विकेट्स घेणाऱ्या सिराजची मन जिंकणारी कृती
भारताने रविवारी (१७ सप्टेंबर) आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने जबरदस्त अशी धारदार गोलंदाजी करत लंकेला दिवसा तारे दाखवले. त्याने ७ षटकांत २१ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात केवळ भेदक गोलंदाजीच केली नाही तर त्याच्या बक्षिसाची रक्कम देखील मैदानावरील ग्राऊंड्समन्सना त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून दिली. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.
सिराजला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून ५००० डॉलर (सुमारे ४.१५ लाख रुपये) मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानातील ग्राऊंड्समन्सना सुपूर्द केली. तो म्हणाला, “हा रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समन्सना देतो ज्यांच्या मुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.” आशिया खंडातील बहुतांश सामने पावसाने विस्कळीत केले. या कालावधीत ग्राऊंड्समन्सना पुन्हा पुन्हा कव्हर आणावे लागले. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका यांनीही त्यांचे कौतुक केले.