‘पाच हजार वर्षांपासून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी धर्मनिरपेक्षतेबाबत मोठं विधान केलं. भारत हा पाच हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताने लोकांमधील एकजूट आणि मानवी वर्तनाचं सर्वोत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. ते आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक रंगा हरी यांनी लिहिलेल्या ‘Prithvi Sookta – An Ode To Mother Earth’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावं. आम्ही मातृभूमीला आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा एक महत्त्वाचा घटक मानतो. आपली पाच हजार वर्षे जुनी संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे. हाच निष्कर्ष सर्व तत्वज्ञानामधून निघतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हीच आपली भावना आहे. हा केवळ सिद्धांत नाही, हे आधी लक्षात घ्या आणि मग त्यानुसार वर्तन करा,” असंही आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
“आपल्या देशात खूप विविधता आहे. एकमेकांशी भांडू नका. आम्ही सर्वजण एक आहोत, हा संदेश जगाला देण्यासाठी आपल्या देशाला सक्षम बनवा. हाच भारताच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे,” असंही ते म्हणाले.
जगाच्या कल्याणासाठी द्रष्ट्यांनी भारत निर्माण केला. त्यांनी एक समाज तयार केला, ज्यांनी त्यांचं ज्ञान देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं. ते फक्त संन्यासी नव्हते. ते आपल्या कुटुंबासह भटक्यांचे जीवन जगत होते. हे सर्व ‘घुमंतू’ (भटके) आजही इथे आहेत, ज्यांना इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून घोषित केलं होतं. ते बर्याचदा समाजात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. तर काहीजण आयुर्वेदिक ज्ञान देतात,” असंही मोहन भागवत यांनी पुढे नमूद केलं. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.