बांबोळीत होणार 500 खाटांचे मानसोपचार रूग्णालय
पणजीमध्ये बांबोळी येथील इंस्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेव्हियर (IPHB) येथे मानसोपचार रूग्णालय सुरू होणार आहे. 500 खाटांचे हे नवीन मानसोपचार रूग्णालय पूर्ण होण्यास डिसेंबर अखेरपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, या रूग्णालयासाठी 105 कोटी रुपये खर्च आलेला आहे.
96,000 चौरस मीटर परिसरात हे रूग्णालय असणार आहे. हे नवीन रूग्णालय गोव्यातील वाढत्या मानसिक आरोग्याच्या प्रकरणांवर लक्ष देईल. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, गोव्यात दररोज सुमारे 40 ते 50 नैराश्यग्रस्त रूग्ण येत असतात.
चिंतेत असणारे रूग्ण, आत्महत्येचे विचार मनात येणारे अशा अनेकांचा यात समावेश आहे. याशिवाय इतर मानसिक आजार असलेले रूग्णही येथे उपचारासाठी येतात.
बांबोळीमध्ये नवीन मनोरुग्णालय बांधण्याचे कंत्राट क्यूबिक इन्फ्राला मिळाले आहे. येथे एक संशोधन आणि विकास केंद्र आणि एक स्वयंपाक घरदेखील बांधेल. कंपनीला गेल्या वर्षी जूनमध्ये निविदा मंजूर झाली होती.
तसेच ती पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाला गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने मान्यता दिली आहे.