ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन
प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.
बाबा महाराज सातारकर यांनी जसं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं, तसंच त्यांनी शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. ११व्या वर्षापासूनच त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते.
१९६२ साली आप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन-प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली.