राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमुळे जयपूर हादरलं आहे. हत्येची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडींवर एकूण चार गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून गोगामेडी यांच्या शेजारी राहणाऱ्या इतर लोकांनी गोगामेडींच्या घराकडे धाव घेतली. हल्ला झाला तेव्हा गोगामेडी यांच्याबरोबर घरात उपस्थित असलेले अजित सिंह हेदेखील या हल्ल्यावेळी गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत.
या हत्याप्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुखदेव सिंह गोगामेडी मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांच्या घरीच होते. दुपारी १.४५ वाजता चार हल्लेखोर मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी घरात घुसून गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. या हल्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले आहेत. श्यामनगर पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत आहेत.
या हत्या प्रकरणावर बोलताना जयपूर पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ म्हणाले, हल्लेखोर कोण होते याची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांच्या मागावर गेलेल्या पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक हल्लेखोर ठार झाला आहे. नवीन सिंह शेखावत असं त्याचं नाव असून तो जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. शाहपुरात त्याचं एक छोटं दुकान आहे. इतर दोन हल्लेखोर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची स्कूटर घेऊन पळून गेले.
हल्लेखोरांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाशी बातचीत केली. गोगामेडी घरात असल्याची माहिती घेतली आणि मग ते घरात घुसले. आत जाऊन ते गोगामेडी यांच्याशी बोलत होते. बातचीत सुरू असतानाच हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.