सातारा ( महेश पवार) :
सातारा जिल्हा हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला असून प्रत्येक पक्षाला साताऱ्याची जागा हवी असल्याने विरोधक असो वा सत्ताधारी यांच्यात सातारा लोकसभेच्या तिकिटावरून अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. यामुळेच सातारा लोकसभेचे उमेदवारीचे मानकरी कोण असणार याकडे जिल्हावासियांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा लोकसभेसाठी भाजपकडून खासदार उदयनराजे इच्छुक असून, शिवसेना शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधवांनी नैसर्गिकरित्या सातारा लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले, त्यामुळे आचारसंहिता जाहीर होऊन सुद्धा सातारा लोकसभेचा उमेदवारीचा तिढा सुटता सुटत नाही.
मागील निवडणुकीत मोदींच्या लाटेत देखील पुरुषोत्तम जाधवांनी अपक्ष उमेदवार असताना देखील २ लाख ३६ हजार मते मिळवली होती, तर गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढून तुमचं योग्य पुनर्वसन करु असं आश्वासन दिले होतं. परंतु गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन पुर्ती झाली नसल्याचे जाधव यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. यामुळेच पुर्वीपासून सातारा लोकसभा मतदारसंघ हा नैसर्गिकरित्या शिवसेनेच्या हक्कांचा असून कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार असेल असा वारंवार पुरुषोत्तम जाधव दावा करताना दिसत आहेत.
एकीकडे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आणि वारकरी कुटुंबातील पुरुषोत्तम जाधवांनी तिन्ही पक्षातील नेत्यांना घायाळ केले असून महायुतीच्या नेत्यांनी दिल्ली वाऱ्या करून देखील साताऱ्याच्या उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे खा. उदयनराजेंच्या उमेदवारीवर भाजपमधीलच काही नेत्यांनीच पडद्यामागून नाराजीचा सूर आळवला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारीचं घोगडं अडकल्याने सातारा लोकसभेची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.
..
https://youtu.be/SI1QLiRkVIk?si=bj5kd1zB1JHmgpIF