“हा’ असा आहे भाजपचा ‘विकसीत भारत’ : ॲड. रमाकांत खलप
पणजी :
करदात्यांचे पैसे गटारात टाकणे हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘विकसीत भारत’ आहे का, याचे उत्तर माझे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाद नाईक गोमंतकीयांना देतील का? अशा प्रकारे सार्वजनिक निधी गटारांत टाकणे योग्य आहे का? पणजी स्मार्ट सिटीत गोंधळ झाल्यानंतर आता सांगोल्डा येथे बेजबाबदारपणाने काम केले जात आहे. 2004 ची इंडिया शायनिंग विसरू नका असा इशारा काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजपला दिला आहे.
सांगोल्डा येथे पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीवरच बांधलेल्या सांडपाणी चेंबरचे छायाचित्र प्रसिद्ध करुन ॲड. रमाकांत खलप यांनी भाजप सरकार निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याची टीका केली.
‘मिशन टोटल कमिशन’ हे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यांना लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेची काळजी नाही. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मला भाजपने हाती घेतलेला एकच असा प्रकल्प दाखवू द्या जो दर्जेदार आणि प्रमाणित गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांनुसार आहे, असे उघड आव्हान ॲड. रमाकांत खलप यांनी दिले आहे.
भाजप सरकारच्या प्रकल्पांना अवघ्या सहा महिन्यांत तडे जातात, छप्पर कोसळतात, जमिनीवरील फरशा अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत उखडल्या जातात. भाजपच्या प्रकल्पांना गॅरंटी नाही आणि वॉरंटीही नाही, असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.
नवीन पाटो पूल, अटल सेतू, पणजी स्मार्ट सिटी, कला अकादमी नूतनीकरण, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, न्यू जुवारी पूल, शेकडो बळी घेणारा पात्रादेवी ते पर्वरी महामार्ग, लुसोफोनिया आणि नॅशनल गेम्ससाठी बांधलेले स्टेडियम हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराची ज्वलंत उदाहरणे आहेत, असे ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.
अहंकारी आणि भ्रष्ट भाजपला कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.