‘त्या’ गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची कॉंग्रेसची मागणी
मडगाव :
हे धक्कादायक आहे. आपला जीव गमावलेल्या निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने गोवा हे गुन्हेगारीचे ठिकाण बनले आहे. सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची माझी मागणी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
दाबोळी येथे काल एका पाच वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार व हत्येच्या घटनेवर संतप्त प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबद्दल भाजपवर टीका केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात गोव्यात गुन्हेगार मोकळे आहेत. निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पूर्ण अपयशामुळे आणखी एका निष्पापाचा जीव गेला. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाप्रती माझी मनापासून सहानुभूती आणि संवेदना. या निर्दयी घटनेत गुंतलेल्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी मागणी केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी केली.
5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या, अशा धक्कादायक घटनांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि भीतीची भावना निर्माण होते आणि गोव्याचे चांगले नाव आणि प्रतिमा कलंकित होते. दिवसेंदिवस हाताबाहेर जात असलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात सरकार कुचकामी असल्याचे या घटनांवरून दिसून येते. पोलिस हे विरोधी सदस्यांच्या मागे लागण्यासाठी नसून गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हे शोधण्यासाठी आहेत असा टोला हळदोणचे आमदार ॲड. कार्लोस फरैरा यांनी हाणला आहे.
या छोट्या मुलीच्या शोकाकुल कुटुंबाप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि तिच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत असतानाच, सर्व बाजूने तपास करून खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे, असे हळदोणचे आमदार कार्लोस फरैरा यांनी म्हटले आहे.
एका निष्पाप मुलीवर बलात्कार आणि हत्या झाल्याची धक्कादायक घटनेने मी व्यथीत झालो. उध्वस्त झालेल्या कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची भीती नाही, असे दक्षिण गोवा लोकसभेचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.
निष्पाप बालिकेच्या बलात्कार आणि हत्येने भाजप सरकारचे नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेले अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे. गोवा आता गुन्हेगारी स्थळ बनले आहे. निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांप्रती माझी संवेदना आहे, असे काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप म्हणाले.
बळी गेलेल्या निष्पाप मुलीच्या कुटुंबीयांना आमची मनापासून सहानुभूती आणि संवेदना. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. या अमानुष कृत्यात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेसने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.