‘मडगाव रवींद्र भवनात संगीत, नृत्य आणि नाट्यकलेचे वर्ग सुरू करण्यासाठी कोणती अडचण आहे?’
मडगाव :
रवींद्र भवन, मडगाव यांनी रविवार 30 जून 2024 रोजी फिल्म क्लबच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. रवींद्र भवन, मडगाव येथे संगीत, नृत्य आणि नाट्यकलेचे वर्ग का सुरू होत नाहीत? कुणा व्यक्तिचे हितसंबंध गुंतले आहेत का? एखाद्या खाजगी संस्थेचे हित जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? असा सरळ प्रश्न दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विचारला आहे.
रवींद्र भवनने फिल्म क्लब सुरू करण्याबाबत केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी रवींद्र भवनने प्रथम स्वतःचे घर व्यवस्थित करण्यावर भर द्यावा आणि इतर विभागांच्या कामात हस्तक्षेप करणे थांबवावे, असे आवाहन केले आहे.
रवींद्र भवन, मडगाव येथे नियमित संगीत, नृत्य आणि नाट्य वर्ग सुरू करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे मी आवाहन करतो. आमच्या जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी यापूर्वी ही मागणी केली होती. दुर्दैवाने रवींद्र भवन व्यवस्थापनाने त्यानंतर कोणतीही पावले उचलली नाहीत, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.
रवींद्र भवन, मडगाव हे संपूर्ण सासष्टी तालुक्याचे सांस्कृतिक केंद्र आहे. नियमित संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रवींद्र भवन समिती इतर सर्व काही करत आहे, परंतु सदर वर्ग सुरू करण्यासाठी पावले उचलत नाही, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नमूद केले.
सरकारने गोवा मनोरंजन संस्थेला चित्रपटाशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी नोडल एजन्सी म्हणून घोषित केले आहे. फिल्म क्लब आणि चित्रपटाशी संबंधित उपक्रमांची काळजी घेणे हे गोवा मनोरंजन संस्थेची जबाबदारी आहे. रवींद्र भवनने मुलांना आणि तरुणांना “परफॉर्मिंग आर्ट्सचे” प्रशिक्षण देऊन कला आणि संस्कृतीला चालना देण्यावर भर दिला पाहिजे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
मला आशा आहे की कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे माझ्या मागणीची दखल घेतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व वर्ग सुरू करण्याच्या सूचना देतील. रवींद्र भवनच्या व्यवस्थापकीय समितीवर आपले वैयक्तिक हितसंबंध असलेल्या आणि खासगी संस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सरकारने नेमू नये, अशी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मागणी केली आहे.