टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव…
टी 20 वर्ल्ड कप 2024 ची फायनलच्या मॅचकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागलेल्या असताना शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला एका ओव्हरमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती. रोहित शर्मानं बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला होता. स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर होता. डेव्हिड मिलरनं पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. बाऊंड्रीवर सूर्यकुमार यादव होता. सूर्यकुमार यादवनं धावत येत कॅच पकडला. सीमारेषेच्या आता जाणार इतक्यात सूर्यकुमार यादवनं बॉल हवेत टाकला पुन्हा बाहेर पळत येत कॅच पकडला. इथं मॅच खऱ्या अर्थानं भारताच्या बाजूनं फिरली. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला.
सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंड विरुद्ध अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांच्या जोडीनं विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या फिरकीपटूंना यश आलं नाही. अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 49 धावा दिल्या.अक्षर पटेलनं 15 व्या ओव्हरमध्ये 24 धावा दिल्या. कुलदीप यादवनं देखील चार ओव्हरमध्ये 45 धावा दिल्या. रवींद्र जडेजा देखील दमदार कामगिरी करु शकला नाही. त्यानं देखील एका ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेननं 52 धावा केल्या. तर, क्विंटन डी कॉकनं 39 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 31धावा केल्या.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत फेल ठरल्यानंतर विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांच्या फलंदाजीमुळं भारतानं 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 176 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहलीच्या 76 धावांचा समावेश होता. अक्षर पटेलनं 47 धावा केल्या होत्या. यानंतर शिवम दुबेनं 27 धावा केल्या. टी 20 वर्ल्ड कप फायनल सारख्या महत्त्वाच्या मॅचमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू फेल ठरले.