आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिपमध्ये भारत अजिंक्य
मडगाव:
नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम वर आयोजित करण्यात आलेल्या, चौथ्या आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात भारताने आपले अजिंक्यपद कायम राखत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रोमहर्षक अंतिम फेरीत, भारतीय पुरुष संघाने इराणचा 11-4 अशा प्रभावी स्कोअरसह, तर महिला संघाने त्याच प्रतिस्पर्ध्यावर 3-2 असा अटीतटीचा विजय मिळवला.
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विजेत्यासंघांना ट्रॉफी प्रदान केली. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपिन्स, इराण, ओमान, इंडोनेशिया, म्यानमार, भूतान या 12 आशियाई देशांतील महिला आणि पुरुषांचे मिळून एकूण 19 संघ सहभागी झाले होते.
16 ते 19 डिसेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे क्रीडा व युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि गोव्याच्या क्रीडा परिसंस्थेवर अशा स्पर्धांचे सकारात्मक परिणाम अधोरेखित केले. “यासारख्या कार्यक्रमांमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते आणि राज्यात ऑलिम्पिक खेळ विकसित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
चौथ्या आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या या विजेतेपदामुळे देशात या खेळाला अजून मोठा राजाश्रय मिळेल, आणि सर्वसामान्य खेळाडू देखील या खेळाकडे आकर्षित होतील, असा विश्वास भारतीय रोल बॉल संघटनेचे आणि गोवा संघटनेचे अध्यक्ष तपन आचार्य यांनी व्यक्त केला.