टीम इंडियाने १० गडी राखून उडवला श्रीलंकेचा धुव्वा
आशिया चषक विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पांड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने फार वेळ न घेता ६.१ षटकात १० गडी राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. इशान किशन आणि शुबमन गिल यांनी नाबाद ५१ धावा करत टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट झाली. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने सहाव्या षटकात दासून शनाका आणि बाराव्या षटकात कुसल मेंडिसला बाद केले. हार्दिक पांड्यानेही तीन बळी घेतले. त्याने दुनिथ वेललागे, मदुशन आणि पाथिराना यांच्या विकेट घेतल्या. बुमराहने परेराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. श्रीलंकेच्या सर्व १० विकेट्स भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. सिराजने सात षटकांत २१ धावा देत सहा बळी घेतले. त्याचवेळी हार्दिकने २.२ षटकांत तीन धावा देऊन तीन बळी घेतले, तर बुमराहने पाच षटकांत २३ धावांत एक विकेट घेतली.