न्हावेलीत ‘अलक्ष लागले दिवे’
पणजी :
जेष्ठ गोमंतकीय कवी शंकर रामाणी यांच्या कवितेवर आधारित ‘ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्यिक समूह, सिंधुदुर्ग’ आणि ‘शब्दसखा ग्रुप न्हावेली’ यांच्या संयुक्त विद्यमाने “अलक्ष लागले दिवे” हा काव्य गायन/ सादरीकरण आणि निरुपणाचा कार्यक्रम नुकताच न्हावेली येथे झाला. सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. अनुजा जोशी आणि सुप्रसिद्ध निवेदक गोविंद भगत हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
कविवर्य शंकर रामाणी यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडून दाखवणाऱ्या, गोव्याची इत्थंभूत माहिती देणाऱ्या अतिशय दर्जेदार कविता डाॅ. अनुजा जोशी यांनी सादर केल्या. त्यांच्या साथीला गोविंद भगत यांनी निवेदनाद्वारे कविताही सादर केल्या. तसेच रसिकांच्या आग्रहाखातर अनुजा जोशी यांनी “माझिया दाराशी चिमण्या आल्या” ही कविता सादर केली. साहित्यप्रेमींची उत्तम साथ लाभलेल्या या कार्यक्रमात सोडतीच्या माध्यमातून १० सदस्याना चिठ्ठ्यांद्वारे निवडण्यात आले होते, यात ऐपै समूहातील सुनंदा कांबळे, अलका नारकर, स्नेहल फणसळकर, संपदा प्रभूदेसाई, प्रणिता गोसावी, देवयानी आजगावकर यांचा समावेश होता.
यावेळी डाॅ. सुमेधा नाईक यांनी ऐलमा पैलमा अक्षर देवा समूहाचा, स्मिता नाईक यांनी शब्दसखा समूहाचा आणि वैशाली पंडित यांनी कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिंबक आजगावकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन स्मिता नाईक, देवयानी आजगावकर व त्रिंबक आजगावकर तसेच शब्दसखा परिवार यांनी केले होते.