
अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपाच्या वाटेवर
अंबरनाथ : नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व नगरसेवक भाजपात प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते.
अंबरनाथ शहराच्या विकासासाठी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने काँग्रेसकडून निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. या नगरसेवकांसोबत अंबरनाथमधील काँग्रेसचे विविध आजी-माजी पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार असून, लवकरच हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
यावेळी बोलताना काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने भूमिका मांडली. केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. मात्र आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता कारवाई केली. अंबरनाथ शहराच्या विकासाला प्राधान्य देत आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.





