मडगाव :
खाऊंगा और भाजपा वालोंको खाने दुंगा! कर्नाटक निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टीमध्येच काळा पैसा फिरत असल्याचा पुरावा आहे. 4.8 कोटी रोख सापडलेल्या कर्नाटकच्या भाजप उमेदवाराविरुद्ध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कारवाई करतील का? “काला धन” भाजपकडेच आहे, असा सणसणीत टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.
फ्लाइंग स्क्वॉड टीमने कर्नाटकातील भाजपचे लोकसभा उमेदवार के. सुधाकर यांच्याकडून 4.8 कोटी जप्त केल्याच्या कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सर्व काळा पैसा भाजपकडेच असल्याचा हा पुरावा आहे अशी बोचरी टीका केली.
देशभरातील एकामागून एक घटना भाजपच्या भ्रष्ट राजवटीचा पर्दाफाश करत आहेत. भ्रष्टाचाराच्या विषाणूला मारण्याची वेळ आली असून भाजपला कायमचा धडा शिकवण्याचे मी गोमंतकीयांना आवाहन करतो, असे अमित पाटकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सांकवाळ येथिल महाभ्रष्टाचार झालेल्या कोमुनीदाद जागेवरील त्यांच्या सभेत कर्नाटकात सापडलेल्या या मोठ्या रोकड जप्तीवर बोलण्याचे धाडस करावे. सदर सभेसाठी रिअल इस्टेट माफियांनी गिळंकृत केलेल्या जागेची निवड करणे म्हणजेच कठपुतळी नरेंद्र मोदींची तार भांडवलदारांशी असल्याचे उघड होते, असे अमित पाटकर म्हणाले.
नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट होईल, असा दावा प्रधानमंत्री मोदिनी केला होता. हे जर सत्य असेल तर भाजपच्या उमेदवारांकडे एवढी रोकड कशी काय आली हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी गरीब जनतेची फसवणूक केली आणि आता जनताच त्यांना धडा शिकवीणार आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोव्यात भाजपने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सभा घेतल्या तरी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, हे निश्चित, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला.