‘ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी ‘केअर सेंटर’ तयार करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या’
मडगाव :
सर्वसमावेशकतेसाठी आता पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. ‘ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी’ एक “केअर सेंटर” निर्माण करणे तसेच त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे काळाची गरज आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ बनविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
गोव्यात शुक्रवार, 6 ते रविवार, 8 जानेवारी 2023 या तीन दिवसीय पर्पल फेस्ट- 2023 च्या अनुषंगाने विरोधी पक्षनेत्यांनी एक निवेदन जारी केले आणि गोव्यातील दिव्यांग हक्क संघटनेला आपला संपुर्ण पाठिंबा व्यक्त केला. गोवा राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाला नेहमी जागरुक राहण्याचे आवाहन करुन आर्थिक फायद्यासाठी स्वार्थी लोकांना दिव्यांगाच्या योजनांचा फायदा घेण्यास देवू नये असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.
ऑटिझम असलेल्या मुलांना सतत काळजी आणि आधाराची गरज असते. त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा आधार मिळतो, पण आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचे भविष्य अंधकारमय होते. प्रशिक्षित सहाय्यक आणि आधुनीक उपकरणांनी सुसज्ज असलेले केअर सेंटर ही काळाची गरज आहे. गोव्यात ऑटिझम असलेल्यांची संख्या मोठी आहे. केअर सेंटर तयार करण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
भारत सरकारने 2021 मध्ये ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षण अधिसूचित केले आहे आणि ऑटिझम व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या पदांच्या श्रेणी देखील जाहीर केल्या आहेत. गोवा सरकारने या अधिसूचनेचा अवलंब करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
मी ऑटिझम असलेल्या काही व्यक्तींना ओळखतो जे काही विषयांमध्ये अत्यंत हुशार आहेत. त्यापैकी काहींनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून ते रोजगाराच्या संधींच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले पाहिजे ज्यामुळे ऑटिझम असलेल्या व्यक्तींना व्यस्त राहण्यास आणि त्यांची उपजीविका कमावण्यास मदत होईल. आपले पालक आणि लहानपणी त्यांची काळजी घेणारे जवळचे नातेवाईक गमावल्यास सदर ऑटिझम व्यक्तिनां पुढील आयुष्यासाठी नोकरीची नक्कीच मदत होईल असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगांना सुलभ व्हावीत यासाठी वेळापत्रक ठरवून त्यादृष्टीने काम हाती घेणे गरजेचे आहे. सरकारने दिव्यांगासाठी सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगच्या जागा आरक्षित केल्या पाहिजेत आणि दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
मला वाईट वाटते की काही संधीसाधू आर्थिक फायद्यासाठी “दिव्यांग व्यक्ती” च्या योजनांचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या हितासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून मलीदा आणि कमिशन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो हे पूर्णपणे दुर्दैवी आहे. आपण ‘विशेष व्यक्तींना’ आदर आणि सन्मान देत त्यांच्याशी ‘विशेष’ पद्धतीने वागले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.