google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘मडगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्याची घोषणा लवकर साकार व्हावी’

मडगाव :
आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील ईएसआय इस्पितळाला केंद्र सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सक्रिय विचाराधीन स्थळांच्या यादीत समाविष्ट केले असल्याची घोषणा केली. ही घोषणा लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरावी, असे मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

१६ फेब्रुवारी २००९ रोजी, तेव्हाचे केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी गोव्यात एक वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा उभारण्याची घोषणा केली होती, यासाठी राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून द्यावी अशी अट ठेवली होती. ही घोषणा मडगाव येथील ईएसआय इस्पितळाच्या सुसज्जीकरण भूमिपूजन कार्यक्रमात करण्यात आली होती. एका अर्थाने हेच ठिकाण वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वार्थाने योग्य ठरले असते, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

दुर्दैवाने, तेव्हाचे मुख्यमंत्री व सध्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सदर ईएसआय इस्पितळ प्राकार किंवा कोणतीही इतर जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुचवली नाही व हातची संधी घालवली. या संधीचा अपव्यय म्हणजे दक्षिण गोव्यात आवश्यक असलेल्या आरोग्य व शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठीची दूरदृष्टी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे दाखवतो, असे प्रभव नायक म्हणाले.

मला गोमंतकीयांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, फेब्रुवारी २००९ मध्ये दिलेल्या भाषणात दिगंबर कामत यांनी म्हटले होते, “जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही.” परंतु आज मात्र दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या संदर्भात ते पूर्णतः मौन बाळगून आहेत आणि मडगाव तसेच परिसरातील जनतेच्या आरोग्य गरजांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका प्रभव नायक यांनी केली आहे.

सरकारने आता मडगाव येथील ईएसआय इस्पितळात सुवीधा वाढविण्यावर भर दिला पाहिजे व त्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मेहनती कामगार वर्गाला योग्य, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयाचा पायाभूत ढांचा मजबूत करणे, वैद्यकीय कर्मचारी वाढवणे आणि सेवा विस्तार करणे हे सरकारचे तातडीचे प्राधान्य असावे, असेही प्रभव नायक यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!