शैक्षणिक संस्था की मृत्यूचा सापळा? – प्रभव नायक
मडगाव: बीट्स पिलानी, गोवाच्या कॅंपसमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला धक्कादायक मृत्यू हा गेल्या एका वर्षातील सहावा मृत्यू आहे. सदर घटना आता दुर्दैवी किंवा अपघाती म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. अशा घटनांची सतत पुनरावृत्ती होत असणे ही गंभीर समस्या असल्याचे स्पष्टपणे दर्शवते आणि याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
नायक म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था ही शिक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र असणे अपेक्षित असते. मात्र, वारंवार घडणारे विद्यार्थ्यांचे मृत्यू हे शैक्षणिक ताणतणाव, कॅम्पस संस्कृती आणि घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मानसिक आरोग्य व सहाय्य प्रणालींच्या अपुऱ्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढवणारी बाब म्हणजे, यापूर्वीच्या काही मृत्यूंना अंमली पदार्थांच्या सेवनाशी कथितपणे जोडले गेले असल्याचे माध्यमांतील अहवाल. “या अहवालांत जर थोडीशीही सत्यता असेल, तर ते कॅम्पसमधील देखरेख, प्रतिबंधात्मक यंत्रणा आणि प्रशासनाच्या जागरूकतेतील गंभीर त्रुटी उघड करते, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे प्रभव नायक म्हणाले.
या घटनांच्या हाताळणीमध्ये पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा अभाव असल्याबाबतही नायक यांनी चिंता व्यक्त केली. “ठरावीक निवदने, अंतर्गत चौकशी आणि केवळ औपचारिक आश्वासने देऊन प्रश्न सुटत नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना स्पष्ट उत्तरे हवी आहेत, विद्यार्थ्यांना सुरक्षितता हवी आहे आणि समाजाला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे,” असे प्रभव नायक यांनी ठामपणे सांगितले.
“आणखी किती तरुणांचे प्राण गेल्यानंतर प्रत्यक्ष कृती होणार?” असा सवाल उपस्थित करत प्रभव नायक यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी, संस्थेच्या प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे आणि शैक्षणिक कॅम्पस भय, दुर्लक्ष व अपरिवर्तनीय हानीचे ठिकाण बनू नयेत यासाठी तातडीच्या प्रणालीगत सुधारणांची मागणी केली आहे.

