”या’ मार्गाने सरकार बेरोजगार तरुणांचा मानसिक छळ करत आहे’
पणजी:
भाजप सरकार नोकरीसाठी पैसे मागून बरोजगार तरुणांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. तसेच रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून भाजप सरकारावर टिकास्त्र सोडले.
उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीस प्रणव परब, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश नादर, जॉन नाझारेथ, रिनाल्डो रुझारियो यावेळी उपस्थित होते.
“माहिती तंत्रज्ञान खात्याचा अधिकारी नोकरीसाठी पैसे मागतनाचा ऑडियो व्हायरल झाला आहे. पैसे मागून बेरोजगार तरुणांचा मानसिक छळ करत असल्याची ही घटना अलीकडेच घडली आहे. अशा प्रकारे हे सरकार तरुणांचे करिअर समाप्त करत आहे. युवक काँग्रेसने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरच या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. हे सरकार या भ्रष्ट अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होते,” असे ते म्हणाले.
“गोव्याचा साक्षरता दर 88.70 टक्के आहे. परंतु गोव्याचा एकूण बेरोजगारीचा दर ग्रामीण भागात 11.3 टक्के आहे आणि महिला बेरोजगारीचा दर 14.7 टक्के आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर ८.७ टक्के आहे,” असे ते म्हणाले.
भिके म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अपयशी ठरले असून निर्माण झालेल्या काही नोकऱ्या विकल्या जातात. पात्र उमेदवारांवर हा घोर अन्याय आहे. नोकऱ्या विकणे देखील चुकीचे आहे,” असे भिके म्हणाले.
महेश नादर म्हणाले की, राज्यातील तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत आणि सरकारी अधिकारी अगदी कंत्राटी नोकऱ्या विकण्यात व्यस्त आहेत.
“काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, युवकांना काम करायचे असेल तर नोकऱ्यांची कमतरता नाही. पण मला वाटतं की त्यांना सत्यस्थितीचे भान नाही. त्यांचे सरकार नोकऱ्या विकण्यात व्यस्त आहे,” असे ते म्हणाले.
हे सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे असेही ते म्हणाले.
“आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की हे अधिकारी कोणाच्या पाठिंब्यावर नोकऱ्या विकत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे यांनी याबाबत चौकशी करावी, असे नादर म्हणाले.
रोहन खवंटे यांना त्यांच्या खात्यात झालेल्या या नोकरीच्या घोटाळ्यावरून मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, असे ते म्हणाले.
रिनाल्डो रुझारियो यांनी यावेळी बोलताना राज्यातीन युवक न्यायाची मागणी करत असल्याचे म्हणाले. ‘‘हे सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. रोजगार निर्माण करू शकत नसेल, तर नोकऱ्यांची किंमत तरी ठरवू नका, असे ते म्हणाले.
जॉन नाझरेथ आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही ‘लाचखोरी’ मुद्द्यावर आणि नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.