नेमके ‘काय’ झाले अन् फेरीबोट चिखलात रुतली?
पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट येथील धक्क्यावर उभी करताना वादळी वाऱ्यांमुळे चालकाचा अंदाज चुकला अन् ती धक्क्याच्या बाजूला असलेल्या चिखलात रुतली. ही घटना आज (मंगळवार) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. त्यामुळे फेरीबोटीत असलेले प्रवासी व वाहनचालकांची धांदल उडाली.
पणजी (Panjim) फेरीबोट धक्क्यावर दुसरी फेरीबोट लावणे शक्य नसल्याने रुतलेली फेरीबोट रात्री उशिरापर्यंत तशीच होती. अडकलेल्या प्रवाशांना हलविण्यात आले, मात्र दुचाकी वाहने फेरीबोटीत तशीच होती. ही फेरीबोट मागे घेणे शक्य नसल्याने भरतीची वाट पाहत रात्री उशिरापर्यंत तेथेच उभी करून ठेवण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच या जलमार्गावरील दुसरी फेरीबोट प्रवाशांच्या मदतीसाठी आणण्यात आली. काही पुरुष प्रवासी उड्या मारून दुसऱ्या फेरीबोटीत गेले, मात्र महिला प्रवाशांची कुचंबणा झाली. वाहनचालकही अडकून पडले.
बेतीहून पणजीकडे येणारी फेरीबोट आज संध्याकाळी वादळी वाऱ्यांमुळे चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. ही फेरीबोट नियमित चालक चालवत नव्हता तर फेरीबोटीवर असलेला मशिनिस्ट चालवत होता. पणजीच्या दिशेने येत असताना धक्क्यावर लावण्याऐवजी फेरीबोट डाव्या बाजूने भरकटली व पाण्यातील चिखलात रुतली.