सातारा
‘ब्राईटलँड’वर कारवाई करण्यास नेमकी आडकाठी कोणाची?
सातारा (महेश पवार) :
महाबळेश्वर येथील गल्लीबोळातील अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमण करणं ही स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात ब्राईटलँड सारख्या अनेक हॉटेल्सचं पार्किंग रस्त्यावर केलं जात असल्याने महाबळेश्वरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. हॉटेलच्या कस्टमर्सना रस्त्यावर पार्किंग करण्याची परवानगी नेमकं देतो कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ऐकिकडे हॉटेल वर कारवाई करण्याचे आदेश असतानाही देखील कारवाई नेमकी का होत नाही? जिल्हा प्रशासन नेमकं हतबल का आहे? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
शुक्रवारी अवकाळी परिसरातील ब्राईटलॅण्ड हॉटेलमध्ये विवाह सोहळा होत असताना यानिमित्ताने जमलेल्या वऱ्हाडींच्या शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. परिणामी येथील रस्त्यावरून केट्स पॉईंट व इतर दोन पॉईंट पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी पंचायत झाली. रस्त्यावरून गाडी काढता येत नसल्याने अनेक पर्यटक अक्षरशः त्रस्त झाले होते. रस्त्यावरील पार्किंग पाहून पर्यटकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत संबंधित प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली. हॉटेल बाहेरील रस्त्यावर तो जणू आपलाच असल्याच्या रुबाबात हॉटेलचे कर्मचारी वाहनचालकांना पार्किंग साठी जागा दाखवत होते. पर्यटकांची मोठी गैरसोय होत असताना प्रशासनाचा त्याकडे दुर्लक्ष होणे ही बाब गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिल्या.