‘कार्डिनल’ आर्चबिशप फेर्राव यांना ‘आप’च्या शुभेच्छा
आम आदमी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गोव्याचे आर्चबिशप फा. फिलिप नेरी फेर्राव यांची अल्तिन्हो येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
आप चे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आमदार क्रुझ सिल्वा, कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास आणि माजी मंत्री महादेव नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फादर फेर्राव यांचे अभिनंदन केले. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी फेर्राव यांची ‘कार्डिनल’ पदावर नियुक्ती केली.
आर्चबिशप फेर्राव यांनी आप च्या शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि ‘आप’चे नवनिर्वाचित आमदार लोकांच्या हितासाठी चांगले उपक्रम राबवत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. फा. फेर्राव यांनी यावेळी सांगितले, की दिल्लीतील आप सरकारकडून विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाबद्दल ऐकून आनंद झाला. यापैकी काही सुधारणा गोव्यातील शाळांमध्येही करता येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
“आम्ही फेलिप नेरी फेर्राव यांना ‘कार्डिनल’ म्हणून पदोन्नती मिळाल्याच्या आनंदाच्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. गोव्याची जमीन, पर्यावरण, ओळख आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याच्या आमच्या मोहिमेत त्यांचे आशीर्वाद लाभावे असे आम्हाला वाटते”, असे अॅड. पालेकर यांनी याप्रसंगी सांगितले.
शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये आप युवा शाखेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस आणि मोहीम/समन्वय शाखेचे सरचिटणीस फ्रान्सिस कोएल्हो यांचा देखील समावेश होता.