हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयचे पथक उद्या गोव्याला रवाना होणार आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर तब्बल 25 दिवसांनी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. गोवा सरकारने सोनाली फोगट खून प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सोमवारी गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी डीओपीटी मंत्रालयाला पत्र लिहिले होते.
दरम्यान, सोनाली फोगट यांचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच सीबीआय चौकशीची मागणी करत होते. यासाठी त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन लेखी अर्ज दिला होता. त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पत्र लिहिले होते.
दोन दिवसांपूर्वी, सोनाली फोगट यांची बहीण रुकेश यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमागे राजकीय हेतू असल्याचा संशयही व्यक्त केला होता. रुकेश म्हणाल्या होत्या की, “केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासानंतरच सत्य बाहेर येईल. गोवा पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाही. गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास मालमत्तेच्या कोनातून करत आहेत. या हत्येमागे राजकीय हेतू असू शकतो. मोठे लोक असू शकतात. सोनालीची हत्या राजकीय कारणावरुन झाली असावी, त्यामुळे तपास व्हायला हवा.”
या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सरकारवर दबाव आणल्याबद्दल कुटुंबीयांनी खाप पंचायतींचे आभार मानले आहेत. रुकेश पुढे म्हणाल्या की, “खाप पंचायतींनी पूर्ण सहकार्य केले. खाप पंचायतींमुळेच हरियाणा (Haryana) आणि गोवा (Goa) सरकारवर दबाव निर्माण झाला.” सोनाली फोगट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी रविवारी हिसारमध्ये खाप महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, सोनाली यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सोमवारी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) मंजूरी दिली.