google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”दाबोळी’चे रूपांतर हवाई कोळसा वाहतूक टर्मिनलमध्ये होणार का?’

मडगाव :

एकापाठोपाठ एक विमान कंपन्या मोपाकडे स्थलांतरित होत असून सरकार मूकपणे बघ्याची भुमीका घेत आहे. दाबोळीचे हवाई कोळसा वाहतुक टर्मिनलमध्ये रूपांतर करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे का? मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यावर बोलणार का? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

कतार एअरवेजने जून 2024 पासून त्यांची सर्व उड्डाणे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केवळ बघ्याची भुमीका घेतल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.

मी 2022 मध्ये सरकारला इशारा दिला होता की दाबोळी विमानतळ “घोस्ट एअरपोर्ट” होईल. दाबोळी विमानतळ सुरू ठेवण्यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्वरित पाऊले उचलण्याची विनंती केली होती. दुर्दैवाने, भाजप सरकार विविध विमान कंपन्यांच्या ऑपरेशन्सच्या स्थलांतराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

 

गेल्या दोन वर्षांत दाबोळी येथे प्रवासी वाहतूक आणि एअरलाइन्सच्या व्यवसायामध्ये तीव्र घट झाल्याचे आपण पाहिले आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू राहावे यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप सरकार दक्षिण गोव्यातील जनतेला केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवणार आणि त्यानंतर दाबोळी विमानतळ बंद करून कोळसा वाहतूकदारांच्या ताब्यात देण्याची योजना सरकार आखण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या क्रोनी क्लबला खूश करण्यासाठी ते नौदल तळ देखील हलवू शकतात, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

मला विश्वास आहे की 2024 मध्ये इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करेल आणि काँग्रेस पक्ष दाबोळी विमानतळ चालू राहील याची दक्षता घेईल. गोमंतकीयांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून भाजपचा कुटील डाव हाणून पाडण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!