काँग्रेसची ‘न्याय’साठी गोव्यात देणगी मोहीम सुरू
पणजी:
देशभरातील लोकांना न्याय देण्यासाठी राहुल गांधी यांच्या पुढाकाराला पाठिंबा देण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने गुरुवारी ‘भारत जोडो न्याय यात्रे’साठी देणगी मोहीम सुरू केली.
यावेळी एआयसीसीचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय इंदर सिंगला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पाटील, एआयसीसी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकर, युवा कॉंग्रेस गोव्याच्या प्रभारी रिची भार्गव आणि विरियटो फर्नांडिस या वेळी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना विजय इंदर सिंगला म्हणाले की, देणगीदार कितीही रक्कम दान करू शकतात, ज्यातून त्यांना कर लाभही मिळेल. “आम्ही या देणगी मोहिमेला ‘न्याय यात्रे’शी जोडले आहे, ज्यामध्ये राहुल गांधी लोकांना भेटत आहेत आणि त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. विविध क्षेत्रात लोक त्रस्त आहेत. महिलांसाठी सुरक्षितता नाही, महागाई वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकऱ्या देण्यात भाजप अपयशी ठरला आहे,” असे सिंग म्हणाले.
ते म्हणाले की, या न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ६७०० किलोमीटर अंतर पार करणार आहेत, त्यामुळे लोक प्रति किमी एक पैसा किंवा त्यांना पाहिजे तेवढी रक्कम देऊ शकतात.
“आम्ही रोख पैसे घेत नाही, ते ऑनलाइन पेमेंटद्वारे हस्तांतरित करावे लागतात. एकदा का कोणी पेमेंट केले की त्यांना तुरंत प्रमाणपत्र, पावती आणि राहुल गांधींच्या स्वाक्षरीचे पत्र मिळेल,” असे ते म्हणाले.
“ही मोहीम प्रत्येक बूथपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून ते राहुल गांधींच्या संकल्पनेशी जोडले जातील,” असे ते म्हणाले.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींची यात्रा देशातील जनतेला सामाजिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी आहे.
“लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून राहुल गांधी लोकांच्या भल्यासाठी काम करत आहेत,” असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला आतापर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला असून, अन्याय दूर करून जनता नक्कीच परिवर्तन घडवून आणणार.