मडगाव येथे लक्ष्मण पै यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन
मडगाव: मडगावात जन्मलेले, गोव्याचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे चित्रकार लक्ष्मण पै फोंडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मडगांवचो आवाज यांच्या वतीने रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, इम्पेरियल हॉल, डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियम, मडगाव येथे खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
“वारसा, कला आणि प्रेरणादायी गोमंतकीयाचा शतक महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,” असे आवाहन मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केले आहे.
लक्ष्मण पै फोंडेकर हे गोव्यातील मॉडर्न आर्ट कलेचे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. भारतीय परंपरा, लोककला, पौराणिक विषय आणि आधुनिक अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या चित्रकलेत दिसून येतो. त्यांच्या निर्भीड सर्जनशीलतेमुळे आणि वेगळ्या शैलीमुळे त्यांना देश-विदेशात मान्यता मिळाली, असे नायक यांनी सांगितले.
कलेतील अतुलनीय योगदानाची दखल घेत लक्ष्मण पै फोंडेकर यांना प्रथम पद्मश्री, त्यानंतर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच गोव्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘गोमंत विभूषण’ प्रदान करण्यात आला, ज्यामुळे गोवा व भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील त्यांचे स्थान अधोरेखित होते, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
या जन्मशताब्दी कार्यक्रमास त्यांचे सुपुत्र आकाश पै व कुटुंबीय, तसेच लक्ष्मण पै यांचे नामवंत शिष्य प्रा. महेश वेंगुर्लेकर, निरुपा नाईक, महेंद्र आल्वारिस, श्रीधर कामत बांबोळकर व संजय हरमलकर उपस्थित राहणार असून, यामुळे गुरु–शिष्य परंपरेचा सशक्त वारसा अधोरेखित होईल, असे प्रभव नायक म्हणाले.
लक्ष्मण पै यांच्या आयुष्यभराचा कला-साधना, शिस्त आणि सांस्कृतिक जडणघडण याला कार्यक्रमात उजाळा मिळणार आहे. त्यांचे प्रेरणादायी कार्य नवीन पिढीला दाखविण्याचा हा प्रयत्न आहे, असे नायक म्हणाले.
मडगांवचो आवाजने सर्व नागरिक, कलाकार, विद्यार्थी आणि कला-प्रेमींना या ऐतिहासिक जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि ज्यांचे जीवन व कला काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणा देत राहतील, अशा या गोव्याच्या महान सुपुत्राला आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभव नायक यांनी केले आहे.


