पणजी :
वन विभागाच्या वतीने राज्यातील अभयारण्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. यासाठी केंद्रीय मंत्रालयाने सकारात्मक अनुमती दर्शवली आहे.
राज्यात वन्यजीव अधिवासाचा एकात्मिक विकास याअंतर्गत गवताळ प्रदेशांच्या देखभालीसाठी वृक्षारोपण करण्यासाठी मंजुरी मागितले आहे. फळझाडांच्या लागवडीबरोबर जंगलात रस्त्यांची निर्मिती आणि त्यांची देखभाल याबाबतही सविस्तर चर्चा झाली. याशिवाय अभयारण्यामध्ये निसर्ग कॅम्पिंग सुविधा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या आधारे कृत्रिम पाणवठे तयार करण्याविषयीही चर्चा झाली, असं मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
राज्यातील एकमेव नैसर्गिक अधिवास असलेल्या बोंडला प्राणी संग्रहालयाचा एकात्मिक आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्रालय आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला प्राणी संग्रहालयाचा मास्टर प्लॅन सादर केला आहे. गुजरात येथील केवडिया येथील ऍनिमल सफारीच्या धर्तीवर गोव्यातही ॲनिमल सफारी करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबत केंद्रीय मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती राणे यांनी दिली.